‘सिद्धार्थ’तील शवविच्छेदन केंद्र कधी सुरू होणार?

By Admin | Updated: December 16, 2014 01:36 IST2014-12-16T01:36:04+5:302014-12-16T01:36:04+5:30

आघाडी सरकारच्या लाल फितीत अडकलेल्या गोरेगावच्या सिद्धार्थ हॉस्पिटलमधील शवविच्छेदन केंद्र युती सरकारच्या कारकिर्दीत सुरू होईल का

When will the autopsy center of Siddhartha start? | ‘सिद्धार्थ’तील शवविच्छेदन केंद्र कधी सुरू होणार?

‘सिद्धार्थ’तील शवविच्छेदन केंद्र कधी सुरू होणार?

मनोहर कुंभेजकर, गोरेगाव
आघाडी सरकारच्या लाल फितीत अडकलेल्या गोरेगावच्या सिद्धार्थ हॉस्पिटलमधील शवविच्छेदन केंद्र युती सरकारच्या कारकिर्दीत सुरू होईल का, असा सवाल गोरेगावकरांना पडला आहे. या शवविच्छेदन केंद्रासाठी लागणारे ४ वैद्यकीय अधिकारी आणि २५ कर्मचारी, अशी एकूण २९ रिक्त पदे सार्वजनिक आरोग्य खात्याने गृहखात्याला उपलब्ध करून दिलेली नाहीत. ही रिक्त पदे उपलब्ध करून दिल्यावरच रीतसर हे शवविच्छेदन केंद्र सुरू होऊ शकेल, असे मत सूत्रांनी व्यक्त केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी हे शवविच्छेदन केंद्र सुरू करण्यासाठी गेली दोन वर्षे सुरू असलेला घोळ मिटवून पश्चिम उपनगरातील नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी गोरेगावकरांनी केली आहे. या केंद्राचा फायदा जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड येथील नागरिकांना होणार आहे.
पश्चिम उपनगरात शवविच्छेदन केंद्रांची कमतरता भासत असतानाच पालिकेने गोरेगावच्या सिद्धार्थ हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदन केंद्रासाठी लागणारी सर्व यंत्रणा उभी करून मागील राज्य शासनाच्या गृहखात्याकडे एक वषापूर्वी हस्तांतरित केले. सदर शवविच्छेदन केंद्र पालिकेने गृहखात्याकडे हस्तांतरित केले. मात्र आरोग्य आणि गृह खात्यात समन्वय नव्हता. ४ वैद्यकीय अधिकारी आणि २५ कर्मचारी अशी एकूण २९ रिक्त पदे सार्वजनिक आरोग्य खात्याने गृहखात्याला उपलब्ध करून दिलेली नाहीत. ही रिक्त पदे उपलब्ध करून दिल्यावरच हे शवविच्छेदन केंद्र सुरू होऊ शकेल, अशी माहिती शिवसेना नगरसेविका प्रमिला शिंदे यांनी दिली.
शिंदे यांच्या दाव्यानुसार, पालिका प्रशासनाकडे सतत पाठपुरावा करून शवविच्छेदन केंद्रासाठी निधी उपलब्ध करून दिला. सिद्धार्थ हॉस्पिटलच्या आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांना शवविच्छेदन केंद्राचा त्रास होऊ नये म्हणून सदर हॉस्पिटलच्या संरक्षक भिंतीची उंची वाढवण्यात आली. सिद्धार्थ हॉस्पिटल आणि शवविच्छेदन केंद्रामध्ये संरक्षक भिंत उभारली, मृतदेह ठेवण्यासाठी वॉक-इन कूलर बसवण्याची व्यवस्था केली, फर्निचर, शवविच्छेदनासाठी बेड अशी सर्व यंत्रणा उपलब्ध करून दिली. असे असूनही हे शवविच्छेदन केंद्र सुरू होऊ शकले नाही.

Web Title: When will the autopsy center of Siddhartha start?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.