Join us  

मुंबईतील २७८ पोलीस अधिकारी कधी होणार ‘रिलिव्ह’?; संबंधितांमध्ये नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2019 12:51 AM

बढतीला २ महिने उलटूनही पूर्वपदावरच

जमीर काझी मुंबई : सेवाज्येष्ठता व गुणवत्तेनुसार पात्र असतानाही पोलीस मुख्यालयातील आस्थापना विभागाच्या सुस्ताईमुळे तब्बल अडीच वर्षे विलंबाने त्यांना बढती मिळाली. मात्र त्या आदेशाला दोन महिन्यांचा कालावधी उलटूनही अद्यापही ते पूर्वपदावरच कार्यरत आहेत. त्यामुळे ‘आस्मान से गिरे पर खजुर पे अटके’ अशी त्यांची अवस्था झाली आहे. मुंबई पोलीस दलातील २७८ तरुण पोलीस उपनिरीक्षकांची ही खंत आहे. साहाय्यक निरीक्षक म्हणून बढतीच्या ठिकाणी रुजू न झाल्याने त्यांना जादा अधिकाराबरोबरच वेतनवाढ व अन्य भत्त्यांपासूनही वंचित राहावे लागत आहे.

पोलीस मुख्यालयातून ३० आॅगस्टला पदोन्नती मिळालेल्या १,५५८ अधिकाऱ्यांमध्ये त्यांचा समावेश आहे. अन्य पोलीस आयुक्तालये, अधीक्षक कार्यालयांत उर्वरित अधिकारी बढतीसह केव्हाच रुजू झाले. इतकेच नव्हेतर, पदोन्नतीवर मुंबई पोलीस दलात आलेल्यांनाही पोस्टिंग मिळाल्या. मात्र या अधिकाऱ्यांना नियुक्तीच्या ठिकाणी हजर होण्यासाठी सोडण्यात (रिलिव्ह) आलेले नाही. गणेशोत्सव, दसरा, विधानसभा निवडणूक, दिवाळी आदींच्या कारणास्तव त्यांना सोडण्यात आलेले नाही. हे सर्व बंदोबस्त सुरळीत पार पडले असले तरी अद्यापही त्यांना पीएसआय म्हणून राबावे लागत आहे. आता तरी आमच्यावरील अन्याय दूर करा, अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांच्यातून व्यक्त होत आहे.

पोलीस मुख्यालयाने ३० आॅगस्ट रोजी जारी केलेल्या उपनिरीक्षकांच्या ‘जंबो प्रमोशन’मध्ये मुंबई पोलीस दलातील तब्बल ४२५ अधिकाºयांचा समावेश होता. त्यामधील जवळपास १४७ जणांची पदोन्नती मुंबईत झाली. तर १२० अधिकारी अन्य पोलीस घटकातून मुंबईत बदली होऊन आले. या अधिकाºयांची महिना, दीड महिन्याभरापूर्वी साहाय्यक निरीक्षक म्हणून विविध पोलीस ठाणे व शाखांमध्ये नेमणूक करण्यात आली; परंतु मुंबईबाहेर बदली झालेल्या २७८ उपनिरीक्षकांना मात्र विविध महत्त्वाच्या घटना व बंदोबस्ताच्या नावाखाली वरिष्ठ अधिकाºयांनी त्यांना अद्याप कार्यमुक्त केलेले नाही. त्यामुळे अधिकार, वेतनवाढीविना वंचित राहावे लागत आहे. त्याचबरोबर त्यांना आता बदलीच्या ठिकाणी रुजू झाल्यानंतर निवास आणि पाल्यांच्या शिक्षणाची व्यवस्था करण्याच्या गंभीर समस्येला सामोरे जावे लागणार आहे. वरिष्ठ अधिकारी पदोन्नती मिळाल्यानंतर कार्यमुक्त होण्यासाठी एक दिवसाचाही अवधी सोडत नाहीत, मात्र या अधिकाºयांना दोन महिने उलटूनही अद्याप नवीन जागी हजर होण्यासाठी सोडण्यात आलेले नाही. बढती मिळूनही त्यांना पूर्वीच्या पदावर काम करावे लागत आहे. संबंधितांकडून अहवेलना सहन करावी लागत असल्याने ‘न घरका न घाटका’ अशी त्यांची स्थिती झाली आहे.समस्यांबाबत अधिकाºयांना देणेघेणे नसल्याची खंतखात्यातील शिस्तीच्या बडग्यामुळे बढती मिळालेल्या या २७८ उपनिरीक्षकांना तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करावा लागत आहे. कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी प्रत्यक्षात रस्त्यावर उतरून वरिष्ठांच्या आदेशाचे पालन आणि अंमलदारांचे नेतृत्व करणाºया पीएसआयच्या समस्येबाबत आयुक्त, वरिष्ठ अधिकाºयांना कोणतेच सोयरसुतक नाही, अशी चर्चा त्यांच्यामध्ये दबक्या आवाजात ऐकायला मिळत आहे. त्यामुळे संबंधित पोलीस अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना बढतीसाठी केव्हा ‘रिलिव्ह’ केले जाणार, हाच प्रश्न भेडसावत असल्याची नाराजी त्यांच्यामध्ये आहे.

टॅग्स :पोलिस