Join us  

पाकड्यांनी आपल्याविरुद्ध युद्ध पुकारले आहे हे आपण कधी मान्य करणार - उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2018 8:29 AM

शस्त्रास्त्रे शमीच्या झाडावरून काढून युद्धात वापरायची असतात. पाकिस्तान नेमके तेच करीत आहे. आमचे राज्यकर्ते हे कधी करणार?

ठळक मुद्दे पाकड्यांनी आपल्याविरुद्ध पुकारलेले युद्धच आहे हे वास्तव आपण कधी मान्य करणार आणि पाकड्यांना त्याच पद्धतीने प्रत्युत्तर कधी देणार? त्यांनी आमच्या जवानांवर, निरपराध गावकऱ्यांवर उखळी तोफांचा मारा करायचा, गोळीबाराच्या फैरी झाडायच्या आणि आम्ही मात्र ‘खपवून घेणार नाही!

मुंबई - शस्त्रास्त्रे शमीच्या झाडावरून काढून युद्धात वापरायची असतात. पाकिस्तान नेमके तेच करीत आहे. आमचे राज्यकर्ते हे कधी करणार? शस्त्रसंधीचे उल्लंघन या शब्दाच्या भूलभुलैयातून बाहेर पडून सीमेपलीकडून होणारे हल्ले हे पाकड्यांनी आपल्याविरुद्ध पुकारलेले युद्धच आहे हे वास्तव आपण कधी मान्य करणार आणि पाकड्यांना त्याच पद्धतीने प्रत्युत्तर कधी देणार? असा सवाल शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेखातून विचारला आहे. 

रविवारी काश्मीर खो-यात नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानने केलेल्या मिसाइल हल्ल्यात कॅप्टन कपिल कुंडूसह चार जवान शहीद झाले. पाकिस्तानच्या या नापाक हरकतीनंतर संपूर्ण देशात संतापाचे वातावरण असून आपण कधी अशी कारवाई करणार असा प्रश्न विचारला जात आहे. त्याच मुद्यावरुन आजच्या सामनाच्या अग्रलेखातून मोदी सरकारला प्रश्न विचारण्यात आले आहेत. 

गोळीबाराच्या फैरीझाडायच्या आणि आम्ही मात्र ‘खपवून घेणार नाही!’, ‘त्यांच्या एका गोळीला शंभर गोळय़ांनी प्रत्युत्तर दिले जाईल’, ‘पाकिस्तानला धडा शिकवला जाईल’ असे शाब्दिक तोफगोळे आणि कागदी क्षेपणास्त्रे फेकायची. केंद्रातील राजवट बदलूनही हे चित्र बदलणार नसेल तर मग बदलले काय?  असा सवाल उद्धव यांनी केला आहे. 

काय म्हटले आहे अग्रलेखात - शस्त्रास्त्रे शमीच्या झाडावरून काढून युद्धात वापरायची असतात. पाकिस्तान नेमके तेच करीत आहे. आमचे राज्यकर्ते हे कधी करणार? शस्त्रसंधीचे उल्लंघन या शब्दाच्या भूलभुलैयातून बाहेर पडून सीमेपलीकडून होणारे हल्ले हे पाकड्य़ांनी आपल्याविरुद्ध पुकारलेले युद्धच आहे हे वास्तव आपण कधी मान्य करणार आणि पाकड्य़ांना त्याच पद्धतीने प्रत्युत्तर कधी देणार? शहीद कॅप्टन कपिल कुंडू यांच्यासारख्या देशासाठी ‘बडी जिंदगी’ जगण्याचे वचन पूर्ण करण्याचा मर्दानी बाणा दाखविणाऱ्यांचा हा सवाल आहे.

- ‘जिंदगी लंबी नही, बडी होनी चाहिए’ असे स्टेटस कश्मीर सीमेवर रविवारी शहीद झालेल्या कॅप्टन कपिल कुंडू यांनी आपल्या फेसबुकवर टाकले होते. पाकड्य़ांनी केलेल्या गोळीबारात कुंडू यांच्यासह आपल्या चार जवानांना हौतात्म्य पत्करावे लागले. कपिल कुंडू हे फक्त २२ वर्षांचे होते. १० फेब्रुवारी रोजी त्यांचा वाढदिवस होता, मात्र त्याआधीच ते शहीद झाले आणि देशासाठी ‘बडी जिंदगी’ जगण्याचा वादा पूर्ण केला. आयुष्य तर सगळेच जगतात. अनेकांना दीर्घायुष्य लाभते. त्यातील काही त्याचा लाभ देशासाठी, समाजासाठी करतात, मात्र ‘कमी वयात बडी जिंदगी’ जगण्याचे आणि मातृभूमीचे ऋण फेडण्याचे भाग्य कपिल कुंडू यांच्यासारख्या मोजक्याच सुपुत्रांना मिळते. असे आयुष्य जगायला आणि त्याप्रमाणे जगू द्यायला असीम साहस असावे लागते. कपिल आणि त्यांच्या वीरमातेकडे ते होते. ते त्यांनी दाखवले. त्यासाठी हा देश कायमच त्यांच्या ऋणात राहील, पण शेवटी पाकड्य़ांच्या या कुरापती आपण आणखी किती काळ खपवून घेणार आहोत? 

- त्यांनी आमच्या जवानांवर, निरपराध गावकऱ्यांवर उखळी तोफांचा मारा करायचा, गोळीबाराच्या फैरी झाडायच्या आणि आम्ही मात्र ‘खपवून घेणार नाही!’, ‘त्यांच्या एका गोळीला शंभर गोळय़ांनी प्रत्युत्तर दिले जाईल’, ‘पाकिस्तानला धडा शिकवला जाईल’ असे शाब्दिक तोफगोळे आणि कागदी क्षेपणास्त्रे फेकायची. केंद्रातील राजवट बदलूनही हे चित्र बदलणार नसेल तर मग बदलले काय? आम्ही पाकड्य़ांवर ‘सर्जिकल स्ट्राइक’ केला. आमच्या जवाबी कारवाईत मागील दीड वर्षात सुमारे दीडशे पाकिस्तानी सैनिक मारले गेले. जम्मू-कश्मीरमध्ये दीडशेच्या आसपास दहशतवाद्यांना आमच्या लष्कराने कंठस्नान घातले. हे सगळे मान्य केले तरी पाकड्य़ांच्या सीमेपलीकडून होणाऱ्या कुरापती थांबलेल्या नाहीत. त्यांचे शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरूच आहे. पाकिस्तानी लष्कराचा गोळीबार आणि दहशतवादी हल्ले यात आपण दर तीन दिवसांआड आपला एक जवान गमावत आहोत. आता रविवारी कपिल कुंडूसारखा २२ वर्षांचा होनहार कॅप्टन आणि तीन जवान गमावले. मग त्या सर्जिकल स्ट्राईकचा किंवा दहशतवाद्यांच्या खात्म्याचा काय परिणाम पाकिस्तानवर झाला, असा प्रश्न पडतो.                  

- तो झालेला नाही असाच रविवारी त्यांनी पुन्हा केलेल्या गोळीबाराचा आणि कपिल व इतर तीन जवानांच्या हौतात्म्याचा अर्थ आहे. मात्र हे किती काळ चालणार? लष्करी जवानांचे आयुष्य म्हणजे ‘बडी जिंदगी’च असते आणि ते त्यांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी देशासाठीच वाहिलेले असते हे मान्य केले तरी राज्यकर्त्यांच्या धोरणांमुळे आमचे सैनिक युद्धाशिवाय शहीद होण्याचा सिलसिला किती काळ सुरू राहणार आहे. पाकिस्तान कालपर्यंत सीमेपलीकडून गोळीबार करीत होता. उखळी तोफांचा मारा करीत होता. आता त्यांनी छोटी क्षेपणास्त्र डागण्याची आगळीक केली. आम्ही त्याला जशास तसे प्रत्युत्तर कधी देणार? की आम्ही आमची क्षेपणास्त्र दिल्लीतील राजपथावरील संचलनात परदेशी पाहुण्यांसमोरच मिरवीत राहणार? शस्त्रास्त्रे शमीच्या झाडावरून काढून युद्धात वापरायची असतात. पाकिस्तान नेमके तेच करीत आहे. आमचे राज्यकर्ते हे कधी करणार? शस्त्रसंधीचे उल्लंघन या शब्दाच्या भूलभुलैयातून बाहेर पडून सीमेपलीकडून होणारे हल्ले हे पाकडय़ांनी आपल्याविरुद्ध पुकारलेले युद्धच आहे हे वास्तव आपण कधी मान्य करणार आणि पाकड्य़ांना त्याच पद्धतीने प्रत्युत्तर कधी देणार? शहीद कॅप्टन कपिल कुंडू यांच्यासारख्या देशासाठी ‘बडी जिंदगी’ जगण्याचे वचन पूर्ण करण्याचा मर्दानी बाणा दाखविणाऱ्यांचा हा सवाल आहे.                   

टॅग्स :उद्धव ठाकरेशिवसेना