Join us  

अमेरिकेतील जॅझ बॅंड धारावी रॉक्स ग्रुपच्या तालावर वादन करतो तेव्हा...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2017 11:50 AM

मुंबईत नेहमीप्रमाणे एखादी मैफल करुन जाण्याऐवजी या बॅंडने धारावीच्या रॉक्स बॅंडबरोबर वादन करायचे ठरवले. अमेरिकेच्या मुंबईतील वाणिज्यदुतावासाच्या साथीने काल या दोन्ही बॅंडसची भेट घडवून आणली गेली.

ठळक मुद्देटाकाऊ ड्रम्सच्या साथीने ताल धरणारा हा बॅंड पाहून अरि रोलॅंड यांचे वादक थक्क होऊन गेले. त्यांच्या ड्रमच्या तालावर जॅझची वाद्य वाजवण्याचा मोह त्यांनाही आवरता आला नाही.

मुंबई- 19 व्या शतकाच्या शेवटी आणि 20 व्या शतकाच्या सुरुवातीला अमेरिकेच्या दक्षिणेस असणाऱ्या न्यू आर्लिन्स प्रांतात जॅझ संगिताचा जन्म झाला तोच मुळी आफ्रिकन समुदायामध्ये. कोणे एकेकाळी आफ्रिकेतून अमेरिकेत गुलाम म्हणून आणल्या गेलेल्या या लोकांच्या वाद्यातून जॅझचे सूर बाहेर पडले. सरुवातीच्या काळामध्ये केवळ समाजाच्या निम्न स्तरातील, गरीब लोकांमध्ये वाजवले जाणारे हे संगीत हळूहळू अमेरिकाभर पसरले आणि नंतर ते जगभरात पसरले. 1930 साली जॅझ भारतामध्ये आले. ब्रिटिश काळामध्ये मुंबईतील अनेक हॉटेलांमध्ये जॅझ वाजवलं जाई. दक्षिण मुंबईत गेलॉर्डससारख्या जुन्या रेस्टोरंटमध्ये दुपारी जेवणापासून दिवसभर जॅझ वाजवलं जाई, इतकं मुंबईने या जॅझला आपलसं केलं होतं. मुंबईपाठोपाठ कोलकात्यातही जॅझचे सूर आळवले जाऊ लागले.

अशाच जॅझ संगिताचा अमेरिकेतील सुप्रसिद्ध बॅंड एरी रोलॅंड दहा दिवसांसाठी भारताच्या भेटीवर आहे. मुंबई, हैदराबाद आणि कोलकाता अशा त्यांच्या प्रवासातील त्यांचा पहिला टप्पा सध्या मुंबईत आहे. मुंबईत नेहमीप्रमाणे एखादी मैफल करुन जाण्याऐवजी या बॅंडने धारावीच्या रॉक्स बॅंडबरोबर वादन करायचे ठरवले. अमेरिकेच्या मुंबईतील वाणिज्यदुतावासाच्या साथीने काल या दोन्ही बॅंडसची भेट घडवून आणली गेली. धारावीतील या मुलांसमोर वेगवेगळी जॅझ गाणी वाजवल्यानंतर धारावी रॉक्सचे रॅपर, बिट बॉक्सेस आणि वादकांनी आपलीही कला त्यांच्यासमोर सादर केली. टाकाऊ ड्रम्सच्या साथीने ताल धरणारा हा बॅंड पाहून अरि रोलॅंड यांचे वादक थक्क होऊन गेले. त्यांच्या ड्रमच्या तालावर जॅझची वाद्य वाजवण्याचा मोह त्यांनाही आवरता आला नाही. दोन्ही बॅंडच्या वादकांना एकमेकांची भाषा येत नसली तरी सूर-तालांच्या भाषेने दोन्हींमध्ये चटकन मैत्री झाली. थोड्याचवेळात दोन्ही गटांनी जुगलबंदीही सादर केली. अमेरिकन बॅंडच्या अरि रोलॅंड यांनी या प्रयोगामुळे आपण भारावून गेलो आहोत अशीच प्रतिक्रिया दिली. मुंबई शहर उत्साहानं भरलेलं शहर आहे, हा उत्साह धारावीच्या मुलांच्या ड्रम्समध्ये दिसल्याचे रोलॅंड यांनी यावेळेस सांगितले.

धारावी रॉक्स हा धारावीतल्या कलाकार मुलांचा एक गट आहे. विनोद शेट्टी यांच्या प्रयत्नांमधून हे सगळे कलाकार एकत्र येऊन देशभरात कला सादर करतात. नुकतेच काही दिवसांपुर्वी या गटातील मुले इंग्लंडमध्ये सात दिवस आपली कला विविध देशांच्या कलाकारांसमोर सादर करुन आले आहेत. अरि रोलॅंड यांच्या बॅंडबरोबर धारावीच्या मुलांना वाद्यं वाजवायला मिळाल्यामुळे या मुलांचा उत्साह आणि आत्मविश्वास नक्कीच वाढला असेल असे मत शेट्टी यांनी व्यक्त केले.

आणखी वाचा: सामूहिक एनसीसी गीत गायनाची 'लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये नोंद

टॅग्स :भारतमुंबईसंगीतअमेरिका