जेव्हा रोबो चक्क बॅडमिंटन खेळतो
By Admin | Updated: March 26, 2015 00:43 IST2015-03-26T00:43:13+5:302015-03-26T00:43:13+5:30
रोबोला अनेक कामे करताना पाहिले आहे. मात्र हाच रोबो जेव्हा बॅडमिंटन खेळतो, तेव्हा बघणाऱ्याला अचंबा वाटल्याशिवाय राहणार नाही.

जेव्हा रोबो चक्क बॅडमिंटन खेळतो
मुंबई : रोबोला अनेक कामे करताना पाहिले आहे. मात्र हाच रोबो जेव्हा बॅडमिंटन खेळतो, तेव्हा बघणाऱ्याला अचंबा वाटल्याशिवाय राहणार नाही. अशीच मजा मंगळवारी विद्याविहार येथील क.जे. सोमय्या महाविद्यालयाच्या प्रांगणात शालेय विद्यार्थ्यांना आली. अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या स्पेशल बॅडमिंटन खेळणाऱ्या रोबोचे प्रात्यक्षिक खास शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आले.
‘एबीयू-रोबोकॉन’ या रोबोंच्या बॅडमिंटन स्पर्धेसाठी क.जे. सोमय्याच्या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी रोबो तयार केला. या स्पर्धेत सुपर लीग २६ पर्यंत या विद्यार्थ्यांनी बाजी मारली होती. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय तसेच विविध महाविद्यालयीन स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी महाविद्यालयाकडून या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यात येते. याचाच भाग म्हणून मुंबईतील शाळकरी विद्यार्थ्यांनाही हा रोबो पाहता येण्यासाठी या प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले.
याविषयी रोबो टीमचा कॅप्टन ऋषी सेठ म्हणाला, ‘मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि टेलिकॉम अशा तीनही विभागांतील विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे काम करून हे रोबो तयार केले आहेत. यामुळे आम्हाला टीममध्ये काम करण्याचे महत्त्व, टाइम मॅनेजमेंट, बजेट मॅनेजमेंट आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंटसारख्या महत्त्वाच्या गोष्टी शिकता आल्या.’
‘आम्ही विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न शिकवता वेगवेगळे प्रयोग करण्यास उद्युक्त करतो’, असे प्राचार्या डॉ. शुभा पंडित यांनी सांगितले. (प्रतिनिधी)