अंदाजपत्रकाची अंमलबजावणी कधी

By Admin | Updated: August 28, 2015 23:28 IST2015-08-28T23:28:49+5:302015-08-28T23:28:49+5:30

तीन वर्षानंतर प्रशासन आणि महासभेचे एकमत होऊन त्यानुसार अंदाजपत्रक मंजूर करुनही त्याची अंमलबजावणी न झाल्याचा मुद्दा विरोधकांनी शुक्रवारी महासभेत चांगलाच लावून धरला.

When to implement budget estimates | अंदाजपत्रकाची अंमलबजावणी कधी

अंदाजपत्रकाची अंमलबजावणी कधी

ठाणे : तीन वर्षानंतर प्रशासन आणि महासभेचे एकमत होऊन त्यानुसार अंदाजपत्रक मंजूर करुनही त्याची अंमलबजावणी न झाल्याचा मुद्दा विरोधकांनी शुक्रवारी महासभेत चांगलाच लावून धरला. अंदाजपत्रक मंजूर न झाल्याने मागासवर्गीय निधी, प्रभाग सुधारणा, नगरसेवक निधी आणि भांडवली कामे रखडल्याचा आरोप विरोधकांनी करुन प्रशासनाला अडचणीत आणले. त्याच वेळी सत्ताधारी गटातील ज्येष्ठ नगरसेवकाने प्रशासनाचा निषेध म्हणून महासभा तहकूब करण्याची मागणी करुन सत्ताधाऱ्यांनाच घरचा आहेर दिला. त्यामुळे विरोधकांनी टाळ्या वाजविल्या. परंतु सत्ताधाऱ्यांना पक्ष श्रेष्ठींचे आदेश येताच त्यांनी पुन्हा महासभा सुरु केली.
स्थानिक संस्था करामध्ये दीडशे कोटी रूपयांची तुट अपेक्षित असल्याने महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी अत्यावश्यक कामांना महत्त्व देऊन इतर कामांना पूर्ण विराम देण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, त्यामुळे प्रशासन आणि महासभेमध्ये एकमत होऊन मंजूर झालेल्या अंदाजपत्रकाला पुन्हा केराची टोपली दाखविण्याचा प्रयत्न असल्याचा मुद्दा विरोधी पक्षातील नगरसेवक सुहास देसाई आणि मुकुंद केणी यांनी उपस्थित केला. अंदाजपत्रक केव्हा मंजूर केले, त्याला विलंब का झाला? असे अनेक प्रश्न उपस्थित करुन विरोधी पक्षाने प्रशासनाला अडचणीत आणले. दुसरीकडे, १९ मे २०१५ ला प्रशासनाने अंदाजपत्रक सादर केले होते. त्यानंतर ६ आॅगस्टला ते मंजूर झाल्याचे पालिकेचे मुख्य लेखा वित्त अधिकारी सुधीर नाकाडी यांनी सांगितले. त्यावर अडीच महिने का विलंब झाला असा सवाल विरोधकांनी केला. (प्रतिनिधी)

तब्बल तीन वर्षांनी प्रशासन, महासभेचे एकमत

२०१२ नंतर कधी नव्हे ते प्रशासन आणि महासभेचे एकमत होऊन अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले आहे. त्यानंतरही नगरसेवकांच्या कामांना कात्री लावली जात असेल तर हा महासभेचा अवमान असल्याचे मत विरोधी पक्षनेते हणमंत जगदाळे यांनी व्यक्त केले.

सत्ताधारी गटातील ज्येष्ठ नगरसेवक विलास सामंत यांनी शहरात कचऱ्याची समस्या आहे, खड्डे पडले आहेत, प्रभागातील कामे होत नाहीत, आणि आपल्याला आजही दुसऱ्यावर अवलंबून राहावे लागत आहे, ही चिंतेची बाब असल्याने प्रशासनाचा निषेध करुन, महासभा पूर्णवेळा तहकूब करण्याची मागणी केली. त्याला विरोधी पक्षनेत्यांनी अनुमोदनही दिले.

नगरसेवक निधी, प्रभाग सुधारणा निधीसह इतर महत्वाची कामे प्रभागातील रखडली आहेत. त्या कामांना निधी न देता, थीम पार्कला देण्यासाठी प्रशासनाकडे निधी येतो कसा असा सवालही जगदाळे यांनी केला.

नियमानुसारच केले काम
सत्ताधारी नगरसेवकाने दिलेल्या घरच्या आहेरामुळे इतर नगरसेवकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. परंतु, काही वेळानंतर पक्ष श्रेष्ठींचा आदेश येताच, ही सभा पुन्हा सुरु झाली.
त्याच वेळेस राष्ट्रवादीचे नगरसेवक नजीब मुल्ला यांनी महासभेने अंदाजपत्रक मंजूर केले असतांनाही ते डावलून आयुक्तांनी कोणत्या नियमानुसार अंदाजपत्रकावर काम सुरु केले, असा सवाल उपस्थित केला.
नियमानुसारच काम केल्याची भूमिका प्रभारी आयुक्त सुनील चव्हाण यांनी मांडली. त्यांची भूमिका अमान्य करुन विरोधकांनी प्रशासनाला पुन्हा अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. अखेर जेवणाच्या सुट्टीद्वारे महापौरांनी त्याला बगल दिली.

Web Title: When to implement budget estimates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.