Join us

मी मुंबईत आलो तेव्हा.... प्लॅटफॉर्मवर मुंगीही शिरू शकत नव्हती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2022 08:03 IST

Hrishikesh Joshi : मुंबईत आल्यावर दुसऱ्या दिवशीच पुढील परिस्थितीची झलक अनुभवली. मी गोरेगाव पश्चिमेला वडिलांचे मित्र सतीश रणदिवे यांच्या घरी उतरलो होतो. तिथे कळले की, अंधेरीला पंकज पराशर नामक दिग्दर्शकाकडे कास्टिंग सुरू आहे.

- हृषिकेश जोशी, अभिनेता

मी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या जागतिक नाट्य महोत्सवात सहभागी होण्यासाठी श्रीलंकेला गेलो होतो. तिथून २७ जून १९९७ रोजी रात्री १२ वाजून २० मिनिटांनी मुंबईत आलो, तो कायमचाच. त्याआधी ३ वर्षे दिल्लीला एनएसडीमध्ये शिकण्यासाठी राहिलो होतो आणि त्याही आधी माझ्या जन्मभूमीत, कोल्हापुरात डॉ. शरद भुताडिया यांच्या प्रत्यय हौशी संस्थेकडून नाट्यक्षेत्रात कार्यरत होतो.

कोल्हापुरात त्यावेळी एका माध्यमिक शाळेत शिक्षकाची नोकरीही केली होती. दिल्लीला जाताना आईचा भावनिक विरोध होता; पण वडील पाठीशी उभे राहिले. त्यांना त्यांच्या उमेदीच्या काळात प्रापंचिक जबाबदाऱ्यांमुळे जे करता आले नव्हते ते मी साध्य करावे. आयुष्य बदलण्याची ही संधी दवडू नये, अजिबात मागे वळूनही पाहू नये, असे त्यांना वाटत होते आणि त्यांनी ते तसे स्पष्टपणे मला बोलूनही दाखवले होते.

मुंबईत आल्यावर दुसऱ्या दिवशीच पुढील परिस्थितीची झलक अनुभवली. मी गोरेगाव पश्चिमेला वडिलांचे मित्र सतीश रणदिवे यांच्या घरी उतरलो होतो. तिथे कळले की, अंधेरीला पंकज पराशर नामक दिग्दर्शकाकडे कास्टिंग सुरू आहे. सकाळी ९ वाजताच गोरेगाव स्टेशन गाठले. सकाळच्या किचाट गर्दीच्या वेळी मला माझ्या आयुष्यातील पहिली ट्रेन पकडायची होती. ट्रेन प्लॅटफॉर्मवर आल्यावर पाहतो तर काय, मुंगीलाही आतमध्ये शिरण्यासाठी जागा नव्हती. काही माणसे खिडकीवर बाहेरून उभे राहिले होते.

मीही मागचापुढचा विचार न करता त्यांच्यासारखाच खिडकीवर चढून उभा राहिलो. ट्रेनने प्लॅटफॉर्म सोडल्यावर  जसजसा वेग वाढत गेला, तशी माझी पार तंतरली. हातापायाला मुंग्या यायला लागल्या. खाली पाहिल्यावर नाले, शेत मागे जात होते. त्यावेळी राम मंदिर स्टेशन नव्हते. गोरेगाव आणि जोगेश्वरी स्टेशनांमध्ये बरेच अंतर होते. घरची सगळी मंडळी डोळ्यासमोर उभी राहिली. आयुष्यात पुन्हा कधीही असला आगाऊपणा  करणार नाही; पण आता लवकर स्टेशन येऊ दे, अशी परमेश्वराकडे प्रार्थना केली. जोगेश्वरी स्टेशन येताच जीव भांड्यात पडला.

वडिलांच्या ओळखीचा वापर ठरवून टाळल्यामुळे स्थिरस्थावर व्हायला थोडा वेळ लागला. सुमारे १० वर्षे; पण प्रचंड अनुभव गाठीशी आला. अनेक चांगली नाटके मिळाली, काही गमावली. खूप मोठ्या मोठ्या कलाकारांबरोबर काम करायची अनेक वेळा संधी मिळाली. कामातून कामे मिळू लागली. अभिनयाबरोबरच लेखन, दिग्दर्शन, डबिंग, पटकथाकार, अशा अनेक भूमिका निभावल्या आणि चिक्कार पारितोषिकेही मिळवली.  

- शब्दांकन तुषार श्रोत्री

टॅग्स :मराठी