बोगस लॅबविरुद्ध कारवाई कधी?
By Admin | Updated: March 25, 2015 02:27 IST2015-03-25T02:27:27+5:302015-03-25T02:27:27+5:30
रक्त, थुंकी, लघवीच्या तपासण्या करून आजाराचे निदान करणाऱ्या काही पॅथॉलॉजी लॅबमध्ये सर्रास काळाबाजार चालू आहे. अनेक लॅबमध्ये पॅथॉलॉजिस्टचे फक्त नाव वापरले जाते.

बोगस लॅबविरुद्ध कारवाई कधी?
पूजा दामले - मुंबई
रक्त, थुंकी, लघवीच्या तपासण्या करून आजाराचे निदान करणाऱ्या काही पॅथॉलॉजी लॅबमध्ये सर्रास काळाबाजार चालू आहे. अनेक लॅबमध्ये पॅथॉलॉजिस्टचे फक्त नाव वापरले जाते. ही बाब काही पॅथॉलॉजिस्टना माहीत असते. काही वर्षांपूर्वी अशाच चार डॉक्टरांच्या विरोधात महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेत केलेल्या तक्रारी अजूनही पडून आहेत. परिषदेने अद्याप एकाही डॉक्टरवर ठोस कारवाई केलेली नाही.
एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण झाल्यावर पदव्युत्तर पॅथॉलॉजीचे शिक्षण घेतलेला डॉक्टरच स्वतंत्रपणे पॅथॉलॉजी लॅब चालवू शकतो. या डॉक्टरने लॅबमध्ये पूर्णवेळ उपस्थित राहणे गरजेचे आहे. मात्र, काही डॉक्टर एकाच वेळी अनेक लॅबसाठी स्वत:चे नाव देतात. त्या ठिकाणी ते जातही नाहीत. ही बाब कायदेशीरदृष्ट्या अवैध ठरते. अशा प्रकारे पॅ्रक्टिस करणारे कऱ्हाडचे डॉ. एम.बी. पवार, मुंबईचे डॉ. प्रवीण शिंदे, डॉ. केतन दावडा आणि डॉ. सूर्यनाथ त्रिपाठी यांच्या विरोधात दोन ते तीन वर्षांपूर्वी परिषदेत तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. पण परिषदेने यावर कोणतीही कारवाई केलेली नसल्याची माहिती महाराष्ट्र असोसिएशन आॅफ प्रॅक्टिसिंग पॅथॉलॉजिस्ट, मायक्रोबायोलॉजिस्टतर्फे देण्यात आली.
या घटनेलादेखील दीड वर्ष उलटून गेले आहे. अद्यापही या दोन्ही डॉक्टरांवर ठोस काहीही कारवाई झालेली नाही. परिषद या डॉक्टरांच्या विरोधात कारवाई का करत नाही? असा प्रश्न वारंवार असोसिएशनद्वारे उपस्थित केला जातो.
१२ वर्षे परिषद सक्रिय नसल्यामुळे अनेक तक्रारींचे निवारण झाले नव्हते. आतापर्यंत आम्ही ५०० तक्रारींचे निवारण केले आहे. खूप महत्त्वाच्या तक्रारींचे निवारण लवकरात लवकर करण्यात प्रयत्न आम्ही करत आहोत. महत्त्वाच्या तक्रारींना प्राधान्य देणार आहोत.
-डॉ. किशोर टावरी, अध्यक्ष, महाराष्ट्र वैद्यकीय परिषद
सहा महिन्यांत
निवारण गरजेचे
महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या २००२ मधील नियमावलीनुसार, परिषदेकडे आलेल्या तक्रारींचे सहा महिन्यांत निवारण झाले पाहिजे. त्यापेक्षा जास्त कालावधी लागल्यास त्यासाठी ठोस कारण देता आले पाहिजे.