नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करताना जनतेशी सौजन्याने वागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:06 IST2021-04-07T04:06:28+5:302021-04-07T04:06:28+5:30

पोलीस आयुक्तांच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना सूचना लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मिनी लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त करत साेमवारी ...

When dealing with those who violate the rules, be polite to the public | नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करताना जनतेशी सौजन्याने वागा

नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करताना जनतेशी सौजन्याने वागा

पोलीस आयुक्तांच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना सूचना

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मिनी लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त करत साेमवारी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानांचे शटर डाऊन केले. मात्र, कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करताना जनतेशी सौजन्याने वागण्याच्या सूचना पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिल्या आहेत. मुंबईतील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधून त्यांनी पोलिसांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या.

यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना नगराळे यांनी पोलिसांना शासनाच्या नियमावलीबाबत सविस्तर माहिती देऊन काय करावे व काय करू नये, याबाबत सांगितले. अत्यावश्यक सेवेसाठी यापूर्वी दिलेले पास या काळातही वैध राहणार आहेत. नव्याने पाससाठी आता सहायक पोलीस आयुक्तांकडे अर्ज करता येईल. यापूर्वी पोलीस उपायुक्तांंकडे याचे अधिकार होते. दिलेल्या पाससंदर्भात योग्य नोंद ठेवून उपायुक्तांंनी त्यावर लक्ष ठेवण्याच्या सूचनाही यावेळी पाेलीस आयुक्तांनी केल्या.

कोविड-१९ च्या नियमांचे पालन न केल्यास योग्य ती कारवाई करताना जनतेशी संयमाने, सौजन्याने संवाद साधून परिस्थिती हाताळणे, कुणालाही कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन शिक्षा करू नये, पोलिसांची प्रतिमा मलीन होईल असे कुठलेही कृत्य करू नये, असेही पाेलीस आयुक्त नगराळे यांनी यावेळी नमूद केले.

सर्व कर्मचारी, अधिकारी यांनी लसीकरण करून घ्यावे. बंदोबस्तादरम्यान स्वतःचीही काळजी घ्यावी. बंदोबस्तादरम्यान वाहनांची कागदपत्रे तपासू नयेत. संशय वाटल्यास हातात ग्लोज घालून पाहणी करावी. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहायक आयुक्त, उपायुक्तांनी कर्मचाऱ्यांच्या गरजांकडे लक्ष द्यावे, कोरोनाबाधित पोलिसांना तत्काळ सर्व मदत मिळेल यासाठी प्रयत्न करावे, अशा सूचनाही यावेळी त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या. सर्व कर्मचाऱ्यांना या सूचनांबाबत मार्गदर्शन मिळावे यासाठी पाेलीस आयुक्तांनी या सर्व मार्गदर्शक सूचनांची ऑडिओ, व्हिडीओ क्लिपही व्हायरल केली.

* पोलीस ठाण्यात वाढदिवस, सेवानिवृत्ती कार्यक्रम नको!

मिनी लॉकडाऊनमध्ये धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक सर्व प्रकारच्या कार्यक्रमांना बंदी आहे. त्यामुळे पोलीस ठाण्यातही वाढदिवस तसेच सेवानिवृत्तीचे कार्यक्रम टाळावे, असे आवाहन पाेलीस आयुक्तांनी केले.

* सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवरही लक्ष

रिक्षा, टॅक्सी, बससेवा सुरू राहणार आहेत. मात्र, रिक्षात दोन प्रवासी, टॅक्सीत ५० टक्के प्रवासी तसेच बसमध्ये उभ्याने प्रवास करता येणार नाही. त्यावरही पोलिसांचे लक्ष असणार आहे.

..............................

Web Title: When dealing with those who violate the rules, be polite to the public