पोलीस आयुक्तालयातील पाळणा हलणार कधी?
By Admin | Updated: January 18, 2015 23:39 IST2015-01-18T23:39:07+5:302015-01-18T23:39:07+5:30
पोलीस आयुक्तालयातील पाळणाघराचे उद्घाटन होऊन आता दोन महिने उलटले तरीही त्यातला पाळणा हलण्याचे नाव अजूनही घेत नाही.

पोलीस आयुक्तालयातील पाळणा हलणार कधी?
पंकज रोडेकर, ठाणे
शहर पोलिसांनी ठाणे चाइल्ड प्रोटेक्शन युनिटबरोबर पोलीस दलात काम करणाऱ्या पोलिसांच्या चिमुकल्यांचे योग्य संगोपन व्हावे, याकरिता पोलीस आयुक्तालयातील पाळणाघराचे उद्घाटन होऊन आता दोन महिने उलटले तरीही त्यातला पाळणा हलण्याचे नाव अजूनही घेत नाही.
पोलीस महासंचालकांच्या आदेशानुसार शहर पोलिसांनी जरीमरी पोलीस लाइन येथे ‘ठाणे शहर पोलीस पाळणाघर’ सुरू करूनही जिल्ह्यातील पहिलेच पोलीस दल होण्याचा मानही पटकावला. मात्र, नाव मोठे आणि लक्षण खोटे असेच चित्र सध्या निर्माण झाले आहे.
ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्र हे ठाणे शहर, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि वागळे इस्टेट असे पसरले आहे. आयुक्तालयातील विविध विभागांत सुमारे ८ हजार ५०० अधिकारी-कर्मचारी कार्यरत आहेत. त्यामध्ये १५ टक्के महिला कर्मचारी आहेत. तसेच सुमारे ५ टक्के पोलीस दाम्पत्य आहेत. पोलीस दलात काम करताना त्यांना सरासरी १२ तासही काम करावे लागते. ते करताना त्यांना आपल्या मुलांच्या आरोग्याची निगा राखण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते.
मग, मुलांना सांभाळण्यासाठी त्यांना एकतर घरी बाई तरी ठेवावी लागते किंवा घराजवळ असलेल्या एखाद्या पाळणाघराचा सहारा घ्यावा लागतो. पोलीस आपल्या मुलांच्या काळजीने व्याकूळ होऊ नयेत म्हणून पाळणाघर ही संकल्पना शहर पोलीस आयुक्तांनी राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, शहर पोलीस वेल्फेअर विभाग कामाला लागला. पाळणाघराच्या जागेपासून मुलांच्या दृष्टीने आवश्यक अशा सर्व सोयीसुविधाही उपलब्ध करून पाळणाघर नावारूपास आले. परंतु त्याचा उपयोगच सुरु न झाल्याने ते असून नसल्यासारखे झाल्याची भावना महिला पोलीसदलात आहे..