Join us

बँक मॅनेजरच ठेवींवर डल्ला मारतात तेव्हा...; १२२ कोटींच्या घोटाळ्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 10:27 IST

‘लकी भास्कर’ या चित्रपटाप्रमाणे कारकून म्हणून काम करणारा कर्मचारी बँकेचा महाव्यवस्थापक बनतो. पदाचा गैरफायदा घेत बँकेच्याच पैशांनी विविध व्यवहार सुरू करतो.

मनीषा म्हात्रे

मुंबई : ‘लकी भास्कर’ या चित्रपटाप्रमाणे कारकून म्हणून काम करणारा कर्मचारी बँकेचा महाव्यवस्थापक बनतो. पदाचा गैरफायदा घेत बँकेच्याच पैशांनी विविध व्यवहार सुरू करतो. त्याच पद्धतीने कारकून ते महाव्यवस्थापक बनलेल्या न्यू इंडिया को-ऑप. बँकेच्या महाव्यवस्थापकाच्या १२२ कोटींच्या घोटाळ्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. अवघ्या पाच वर्षांत हजारो खातेदारांच्या पैशांवर हात साफ करीत असलेल्या प्रकारामागे मेहताच होता की आणखी कोण? याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे. मेहताप्रमाणे अनेक बँक मॅनेजर यापूर्वीच्या कारवाईत अडकले आहेत.

या बँकेचे महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये १.३ लाख खातेधारक आहेत. यापैकी हजारो खातेधारकांच्या १२२ कोटी रुपयांवर मेहताने डल्ला मारला. तशी कबुलीही आरबीआयला ऑनकॅमेरा दिली. मात्र, आजही त्याचे तपासातील असहकार्य आणि बँकेमध्ये सुरू असलेल्या घोळाने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.  यापूर्वीच्या एका प्रकरणात ९० च्या दशकात भुलेश्वर येथील व्यावसायिक हनुमंत प्रसाद यांनी मुलाच्या नावावर एक लाख म्युचुअल फंडमध्ये भरले. पुढे त्याची किंमत १.३९ कोटी झाली. मुलगा अमेरिकेत शिक्षणासाठी गेला. तेथेच ब्रेन हॅमरेजने त्याचा मृत्यू झाला. ८८ वर्षीय वडील दुःखात असल्याने त्यांनी या पैशांकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर बँकेत जाऊन चौकशी करताच, २००८ मध्ये मृत्यू झालेल्या मुलाच्या नावाने दुसऱ्या बँकेत पैसे ट्रान्सफर केल्याचे समजताच त्यांना धक्का बसला.

पोलिसांच्या  चौकशीत पीपीएफ खात्याकडे दुर्लक्ष झाल्याचा फायदा घेत बँक साहाय्यक व्यवस्थापक प्रेम शर्माने दुसऱ्या बँकेत अमित विजय प्रसाद नावाने खाते उघडून हे पैसे ट्रान्सफर केले. पुढे ओळखीच्या व्यक्तींच्या माध्यमातून पैसे वळते करत डल्ला मारल्याचे समोर आले. न्यायालयात हे प्रकरण प्रलंबित आहे. डिजिटल इंडियाच्या युगात बँका तुम्हाला तुमच्या घरी बसून प्रत्येक सुविधा पुरवत आहेत. अशा परिस्थितीत बँक कर्मचारी फसवणूक करू लागले तर तुम्ही स्वतःचा बचाव कसा करणार? त्यासाठी अलर्ट होणे गरजेचे असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

सायन पोलिसांनी ॲक्सिस म्युच्युअल फंडचे माजी व्यवस्थापक विरेश जोशी आणि इतरांविरूद्ध कोट्यवधी रुपयांच्या ‘फ्रंट रनिंग’ फसवणूकप्रकरणी गुन्हा नोंदवला. आर्थिक गुन्हे शाखा तपास करत आहे. आरोपींनी ॲक्सिस म्युच्युअल फंडच्या स्टॉक ब्रोकर्सना गुंतवणुकीच्या योजनांशी संबंधित अंतर्गत माहिती लीक केली आणि ब्रोकर्सनी या माहितीचा वापर करून मोठ्या रकमा कमावल्या. हा गुन्हा सप्टेंबर २०२१ ते मार्च २०२२ दरम्यान घडला होता.

म्युच्युअल फंडात गुंतवणुकीच्या बहाण्याने ३०हून अधिक लोकांची फसवणूक केल्याप्रकरणी बँक मॅनेजर अझर कलाम हाश्मी (३५) यांना नागपाडा पोलिसांनी अटक केली.

येस बँकेच्या महिला उपव्यवस्थापकासह फिशिंग टोळीतील सहा जणांना मुंबई पोलिसांनी अटक केली होती. टोळीच्या सदस्यांना बँक खाती उघडण्यासाठी लोकांकडून ओळखीची कागदपत्रे गोळा करण्यासह विविध जबाबदाऱ्या देण्यात आल्या होत्या. डेप्युटी मॅनेजरने पडताळणी न करता बँक खाते उघडण्याची व्यवस्था केली, तर इतरांनी वृद्ध नागरिकांची बँक डेटा शेअर करत फसवणूक केली. पुढे  त्यांचे पैसे नव्या बँक खात्यात ट्रान्सफर केले.

ज्येष्ठ नागरिकाला गुंतवणुकीचे मार्गदर्शन करण्यास सांगिताना एका ग्राहकाच्या खात्यातून ९.४ कोटी रुपये काढल्याप्रकरणी बँकेच्या एका माजी कार्यकारी अधिकारी रवी शर्माला अटक करण्यात आली. बँकेचे माजी वरिष्ठ रिलेशनशिप मॅनेजर  शर्मा विरूद्ध नोंदवलेल्या तक्रारीनुसार, शर्माने २०१९ ते २०२३ या कालावधीत त्या व्यक्तीच्या खात्यातून ९.४ कोटी रुपये काढून शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडून फसवणूक केली.

बँकेच्या लॉकरमधून सुमारे ३ कोटी रुपयांचे ४ किलो सोन्याचे दागिने चोरल्याप्रकरणी भांडुप पोलिसांनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सेवा व्यवस्थापकासह दोघांना बेड्या ठोकल्या. एसबीआयच्या मुलुंड शाखेत शाखा व्यवस्थापक म्हणून काम करणाऱ्या अमित कुमारने साथीदारांच्या मदतीने यावर हात साफ केला.

पीएमसी बँकेतील ४ हजार ३०० कोटी रुपयांच्या घोटाळ्यात बँकेच्या अनेक संचालकांवर कारवाई झाली.

सुमारे १४ लाख रुपयांच्या ‘पार्ट टाइम टास्क जॉब’मधील कथित भूमिकेसाठी सायबर गुन्हे पोलिसांनी अलीकडेच एका उच्च खासगी क्षेत्रातील बँकेच्या व्यवस्थापक विनोद मलगोंडेसह दोघांना अटक केली.

टॅग्स :बँक