मुंबई - साडेतीन ते चार वर्षांच्या मुलाने शालेय जगात पाऊल ठेवल्यापासून त्याला उच्चशिक्षित होईपर्यंत विविध परीक्षांना सामारे जावे लागते. मुंबई महानगरात रविवारी ७५ वर्षांच्या ‘ज्येष्ठ’ विद्यार्थ्यांसह पाच हजार ६९७ प्रौढ व्यक्ती परीक्षेला सामोरे गेले. निमित्त होते ते साक्षरता परीक्षेचे.
निरक्षर व्यक्तींचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी सरकारकडून विविध पावले उचलण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून प्रौढांना वाचन, लेखन आणि गणिताचे मूलभूत ज्ञान दिले जात आहे. या प्रौढांनी त्यापैकी किती ज्ञान आत्मसात केले, याची तपासणी करण्यासाठी साक्षरता परीक्षा घेतली जाते. या परीक्षेसाठी शिक्षण विभागाकडे ११ हजार ५६७ नोंद केलेल्यांपैकी प्रौढ निरक्षर व्यक्तींपैकी उपनगर व शहर जिल्हा मिळून फक्त पाच हजार ६९७ निरक्षर व्यक्तींनी परीक्षा दिल्याचे योजना विभागाच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
१५ वयाच्या पुढील निरक्षर व्यक्तींची परीक्षा मुंबईतील पालिकेच्या १२ अर्बन रिसर्च सेंटरमध्ये (यूआरसी) रविवारी पार पडली. केंद्र सरकारच्या उल्लास नवभारत ॲपवर मुंबई शहर भागात प्रत्यक्षात एकूण तीन हजार ४५८ प्रौढ व्यक्तींनी नोंद केली. त्यापैकी एक हजार ६६९ प्रौढ व्यक्तींनी साक्षरतेची परीक्षा दिली. तर उपनगरामध्ये पाच हजार ९१० परीक्षार्थींनी नोंद केली. त्यापैकी चार हजार २८ परीक्षार्थींनी परीक्षा दिली,अशी माहिती योजना विभागाने दिली. तर नोंद केलेल्यापैकी निम्म्या परीक्षार्थींनी परीक्षा दिलीच नसल्याचेही शिक्षण विभागाने स्पष्ट केले.
मुंबई जिल्ह्यात नोंदणी केलेल्यांपैकी निम्मेच परीक्षार्थी या परीक्षेला बसल्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना योजना विभागाने सांगितले की, अनेक परीक्षार्थींची तयारी झालेली नसते. त्यामुळे ते या टप्प्यात परीक्षेला बसत नाही. परंतु, मार्च २०२६ मध्ये ते परीक्षा देऊ शकतात. नियमितपणे त्यांची तयारी शिक्षण विभागाकडून करून घेतली जाते. तर, परीक्षेचा निकाल या आठवड्यातच घोषित केला जाणार असल्याची माहिती योजना विभागाच्या शिक्षणाधिकारी भावना राजनोर यांनी दिली.
मला शिक्षणाची आवड : गंभीर पटेल अंधेरीतील मरोळ प्रागतिक मराठी शाळेत परीक्षा केंद्रावर ७५ वर्षांचे गंभीर पटेल यांनी आनंदाने परीक्षा दिली. या वयातही त्यांना अभ्यास करायला आवडतो. शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी व शिक्षकांनी योग्य मार्गदर्शन केल्यामुळे परीक्षा देण्याइतपत तयारी झाल्याचे गंभीर पटेल यांनी सांगितले.