व्हॉट्सॲपच्या नव्या धोरणामुळे वापरकर्ते हवालदिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:13 IST2021-01-13T04:13:02+5:302021-01-13T04:13:02+5:30
तज्ज्ञ म्हणतात चिंता करण्याचे कारण नाही लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : व्हॉट्सॲपच्या नव्या धोरणामुळे वापरकर्ते हवालदिल झाले आहेत. नव्या ...

व्हॉट्सॲपच्या नव्या धोरणामुळे वापरकर्ते हवालदिल
तज्ज्ञ म्हणतात चिंता करण्याचे कारण नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : व्हॉट्सॲपच्या नव्या धोरणामुळे वापरकर्ते हवालदिल झाले आहेत. नव्या धोरणामुळे खासगी आयुष्य धोक्यात येईल, असा आरोप केला जात आहे. नोटिफिकेशन न स्वीकारल्यास ८ फेब्रुवारीपासून व्हॉट्सॲप बंद होईल, असे मेसेज फिरत आहेत. त्यामुळे वापरकर्ते दुसऱ्या ॲपकडे वळत असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे व्हॉट्सॲपच्या नव्या धोरणाची चिंता करण्याचे कारण नसल्याचे मत तज्ज्ञांनी मांडले.
आपण यापूर्वीच बरीच माहिती व्हॉट्सॲपकडे दिली आहे. त्यामुळे नव्या धोरणानुसार आणखी काही नवे त्यांच्याकडे जाणार नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. व्हॉट्सॲपकडून येत असलेले नोटिफिकेशन स्वीकारले गेले तर आपल्या व्हॉट्सॲपचा डेटा फेसबुकला शेअर होईल. थोडक्यात व्हॉट्सॲपवर आपण ज्या ज्या ॲक्टिव्हीटी करतो त्याची माहिती विनासायास उघड होईल, असे मेसेज फिरत आहेत. यासंदर्भात या क्षेत्रात कार्यरत असलेले तज्ज्ञ पीयूष सोमाणी यांनी सांगितले की, मुळात व्हॉट्सॲप धोरणाबाबत जे काही सांगितले जात आहे त्यात काही नवे नाही. कारण आपण कित्येक वर्षे व्हॉट्सॲप वापरत आहोत. आपली पर्सनल माहिती त्यांच्याकडे आहे. आज जगात व्हॉट्सॲप, फेसबुक आणि इंस्टा मोठ्या प्रमाणात वापरले जात आहे. हे सगळे फेसबुककडे आहेत. आपल्याला माहितीही नसेल एवढी आपली माहिती वापरली गेली असेल. आपल्या बहुतांश परवानग्या आपण त्यांना देऊन बसलो आहोत. नवे धोरण आल्यानंतर आता आपण जो विचार करत आहोत तो विचार आपण पूर्वी करणे गरजेचे होते.
आता ज्यांना व्हॉट्सॲप वापरायचे आहे त्यांना त्या नोटिफिकेशनला हो म्हणावे लागेल. पर्याय आहे असे दिसत नाही. टेलिग्राम किंवा सिग्नल हा पर्याय असला तरी सगळे तिकडे शिफ्ट होणार आहे का? शिवाय कोणी काय वापरावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. दरम्यान, एक गैरसमज असा झाला आहे की, व्हॉट्सॲपवरील चॅटिंग फेसबुकवर दिसेल. पण असे काही होणार नाही. व्यापारी वर्गाला कदाचित ही भीती असावी म्हणून विरोध केला जात आहे. आपली पर्सनल माहिती तिकडे जाणार आहे डाटा नाही हे आपण लक्षात घेतले पाहिजे, असेही सोमाणी यांनी सांगितले.
..................