Join us  

ऐ वरली तुझे हुआ क्या है?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2020 3:20 AM

वरळी सी-फेसला असलेली पर्यटकांची आणि मुंबईकरांची गर्दी नाहीशी झाली आहे. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, गृहमंत्री अनिल देशमुख, अन्न व औषधी प्रशासनमंत्री राजेंद्र शिंगणे,

यदु जोशी 

गेले काही दिवस आमची ग्लॅमरस वरळी थांबल्यासारखी झाली आहे. दक्षिण मुंबई आणि उर्वरित मुंबई यांना जोडणारा एक दुवा म्हणून वरळीचा उल्लेख होतो. कुलाबा, लहान कुलाबा, माहीम, माझगाव, परळ, वरळी आणि मलबार हिल या सात बेटांचे एकत्रीकरण करून मुंबई बनविण्यात आली. आजच्या वरळीमध्ये एकीकडे झोपडपट्टी आहे, तर दुसरीकडे बडे उद्योगपती, राजकारणी, क्रीडापटू, सिनेस्टार यांची आलिशान घरेदेखील. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या कन्येचे सासर म्हणजे प्रख्यात उद्योगपती पिरामल. या अंबानी कन्येचा वरळी सी-फेसला असलेला दिमाखदार बंगला आकर्षणाचे आणि सेल्फीचे केंद्र बनलाय. हा बंगला सोडून दहा घरे पुढे गेले की येणाऱ्या वरळी डेअरीच्या ठिकाणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या स्वप्नातील आंतरराष्ट्रीय पर्यटन केंद्र बनणार आहे. समोरच सागरी मार्ग होतोय. सध्या ते काम बंद आहे.

वरळी सी-फेसला असलेली पर्यटकांची आणि मुंबईकरांची गर्दी नाहीशी झाली आहे. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, गृहमंत्री अनिल देशमुख, अन्न व औषधी प्रशासनमंत्री राजेंद्र शिंगणे, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील याठिकाणी नियमित मॉर्निंग वॉकला असतात. तेही आता वरळी सी-फेस मिस करत असतील. ते तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी मंत्री पंकजा मुंडे अशी बरीच राजकारणी मंडळी याच भागात राहतात. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे हे वरळीचे आमदार. बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांशिवाय वरळी सी-फेसला सध्या कोणीही दिसत नाही. याठिकाणी उभारलेला सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांच्या कॉमनमॅनचा पुतळा हिरमुसलाय. सध्या वरळी हा कोरोनाच्या दृष्टीने हॉटस्पॉट बनलाय. सगळीकडे भयाण शांतता असते. एकेकाळची प्रख्यात अभिनेत्री गायिका सुरय्या हिने तलत मेहमूद यांच्या जोडीने गायलेलं एक गाणं खूप गाजलं. ‘दिल-ए-नादाँ तुझे हुआ क्या है, आखिर इस दर्द की दवा क्या है’ गोड गळ्याची सुरय्या काही काळ याच वरळीत राहायची. त्याच गाण्याचा आधार घेऊन मनात येतं, ऐ वरली तुझे हुआ क्या है, आखिर तेरे दर्द की दवा क्या है?

टॅग्स :वरळीमुंबई