लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : माझ्या वक्तव्यांमुळे महाराष्ट्र विधिमंडळाच्या कामकाजात कोणताही व्यत्यय आला नाही. गाण्यात केवळ कलेचा वापर करत व्यंगात्मक, टीकात्मक पद्धतीने मते मांडलेली आहेत. सभागृहाचा अवमान करणे किंवा सदस्यांना चिथावणी देण्याचा त्यात कोणताही हेतू नव्हता, अशा शब्दांत स्टँडअप काॅमेडियन कुणाल कामरा याने हक्कभंगाच्या नोटिसीला उत्तर दिले आहे. शिवाय इतर राजकारण्यांनी जे भाषणात म्हटले, तेच मी गाण्यात वापरले, मग मलाच नोटीस का, असा प्रश्नही कामरा याने उत्तरात केला आहे. कामरा याने काही महिन्यांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या विडंबनात्मक काव्यामुळे वाद निर्माण झाला होता. विडंबन गीताचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर व्हायरल झाले, तर उद्धवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी हाच व्हिडीओ रिपोस्ट करत, शिंदेसेनेवर निशाणा साधला होता. त्यावर, विधान परिषदेत भाजप गटनेते प्रवीण दरेकर यांनी हक्कभंगाची सूचना दिली होती. या हक्कभंगाच्या नोटिसीला कामरा याने लेखी उत्तर पाठविले आहे.
नागरिकांनी वैध मार्गाने अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करत केलेली टीका रोखण्यासाठी हक्कभंगाचा ढालीसारखा वापर करता येणार नाही. सरकारमधील कोणत्याही व्यक्तीला टीका बोचरी वाटली, म्हणून हक्कभंग आणता येत नसल्याचेही कामराने नमूद केले आहे.