Join us  

आग लागल्यानंतर काय करायचे? याचे प्रात्यक्षिक; मुंबई अग्निशमन दलाकडून प्रदर्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2023 11:58 AM

या सप्ताहात अग्निशमन दलाकडून विविध स्पर्धा तसेच बक्षीस वितरण समारंभासह इतर उपक्रम राबविण्यात येणार आहेत. 

मुंबई : आग लागल्यानंतर काय करायचे त्याचे प्रात्यक्षिक, पथसंचलन आणि प्रदर्शन मुंबईकरांना सात दिवस पहायला मिळणार आहे. १४ ते २० एप्रिल  दरम्यान अग्निशमन सेवा सुरक्षा सप्ताह राबविण्यात येणार आहे. या सप्ताहात अग्निशमन दलाकडून विविध स्पर्धा तसेच बक्षीस वितरण समारंभासह इतर उपक्रम राबविण्यात येणार आहेत. 

“शौर्यम् आत्मसंयमनम् त्याग:” हे ब्रीदवाक्य असलेल्या मुंबई अग्निशमन दलाकडून सुरक्षा सप्ताह अंतर्गत भायखळा मुख्यालयात  १४ एप्रिल रोजी सकाळी ८:३० वाजता अग्निशमन दलातील शहिदांना आदरांजली वाहण्यात येणार आहे. यावेळी मुख्य अग्निशमन अधिकारी संजय मांजरेकर, उपप्रमुख अग्निशमन अधिकारी रवींद्र अंबुलगेकर, अनिल परब, यशवंत जाधव, दीपक घोष, एच. आर. शेट्टी, यांच्यासह जवान उपस्थित राहणार आहेत. १४ आणि १५ एप्रिल रोजी विक्रोळी येथील आर सीटी मॉल येथे अग्निशमन दलाकडून विविध प्रात्यक्षिकांची भित्तिपत्रके, तसेच अग्निशमन दलातील साहित्याचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे.  नागरिकांना सायंकाळी पाच पर्यंत प्रदर्शनाला भेट देता येणार आहे. २० एप्रिल रोजी मुंबई विद्यापीठाच्या कलिना येथील मैदानावर अग्निशमन दलाचे जवान संचलन करणार आहेत.

एखादी दुर्घटना घडल्यास अग्निशमन दलाचे जवान ज्या अत्याधुनिक साहित्याचा, तंत्रज्ञानाचा वापर करतात, ती यंत्र या प्रदर्शनात नागरिकांना पहायला मिळणार आहेत.  १६ आणि १७ एप्रिल रोजी गोरेगाव येथील ओबेरॉय मॉलमध्ये तर १८ आणि १९ एप्रिल रोजी लोअर परळ येथील फिनिक्स मॉलमध्येही हे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. 

टॅग्स :अग्निशमन दलमुंबई