श्वानदंश झाल्यावर काय कराल? अँटी रेबीज इंजेक्शन घेण्याचा वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला

By संतोष आंधळे | Updated: December 16, 2024 13:39 IST2024-12-16T13:37:35+5:302024-12-16T13:39:17+5:30

श्वानदंश झाल्यास प्रथम जवळच्या डॉक्टरांकडून उपचार घेणे आवश्यक आहे.

what to do after a dog bite medical experts advise taking anti rabies injection | श्वानदंश झाल्यावर काय कराल? अँटी रेबीज इंजेक्शन घेण्याचा वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला

श्वानदंश झाल्यावर काय कराल? अँटी रेबीज इंजेक्शन घेण्याचा वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला

संतोष आंधळे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : शहरात गेल्या काही महिन्यांत भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे. त्यामुळे अनेकदा नागरिकांना श्वानदंश होण्याच्या घटना घडतात. कुत्र्याचा चावा काहीवेळा इतका भयंकर असतो की, त्यामुळे मोठी जखम होण्याची शक्यता असते. या जखमेतून रक्तस्त्रावही होतो. काही कुत्र्यांचे लसीकरण करण्यात आले आहे. मात्र, रेबीज झालेल्या भटक्या कुत्र्याने चावा घेतला तर त्या व्यक्तीलाही रेबीज होण्याची शक्यता असते. त्यामुळे श्वानदंश झाल्यास प्रथम जवळच्या डॉक्टरांकडून उपचार घेणे आवश्यक आहे.

श्वानदंश झाल्यास रेबीज टाळण्यासाठी प्रथमोपचार म्हणून जखम १५ मिनिटे पाणी आणि साबणाने धुवावी. रेबीज संसर्गाचा धोका कमी करण्यासाठी जखमेवर जंतूनाशक लावावे. श्वानदंशात जखमेवर माती, तेल, लिंबू, खडू, मिरची पावडर यासारखे पदार्थ लावण्यासारखे कोणतेही घरगुती उपाय करू नयेत. जखमेवर पट्टी बांधू नका. कोणतीही हयगय न करता तातडीने डॉक्टरांचा सल्ला आणि उपचार घेणे आवश्यक आहे.

जनजागृतीची गरज

रेबीज आजार आणि वैद्यकीय उपचारांबाबत जनजागृती होत नसल्याने नागरिक डॉक्टरांकडे उपचारांसाठी उशिरा पोहोचतात. काही प्रकरणांमध्ये रुग्णालयात उपचारासाठी दाखल होईपर्यंत रुग्णाचा मृत्यू होण्याची शक्यता असते. त्यामुळे वेळीच वैद्यकीय उपचार घेण्याची गरज आहे.

श्वानदंश झाल्यावर लगेच अँटी रेबीज आणि टिटनेस इंजेक्शन घेणे आवश्यक आहे. गरजेनुसार जखमेवर अँटी रेबीज सीरम देण्यात येते. श्वानदेशानंतर पाच अँटी रेबीज इंजेक्शन घ्यावी लागतात. पहिले इंजेक्शन श्वानदंश झाल्यानंतर २४ तासांत (लवकरात लवकर), दुसरे इंजेक्शन तिसऱ्या दिवशी, तिसरे इंजेक्शन सातव्या दिवशी आणि चौथे इंजेक्शन १४ व्या दिवशी आणि शेवटचं म्हणजेच पाचवे इंजेक्शन २८ व्या दिवशी दिले जाते. रेबीज रोगापासून संपूर्ण सुरक्षिततेसाठी सर्व इंजेक्शन घेणे अति आवश्यक आहे. - डॉ. पल्लवी उपलप, सहायक प्राध्यापक, जनऔषध वैद्यक शास्त्र, सर जे. जे. रुग्णालय
 

Web Title: what to do after a dog bite medical experts advise taking anti rabies injection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :dogकुत्रा