Join us  

'नोटा'विषयी तुम्हाला 'या' गोष्टी माहीत आहेत का?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2019 12:00 PM

'नोटा' म्हणजे काय?

मुंबई : देशाच्या राजकारणातील महत्त्वाचे राज्य असलेल्या महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेची पंचवार्षिक निवडणूक आज होत आहे. हे मतदान ईव्हीएमद्वारे होणार आहे. त्यामुळे विधानसभेसाठी राज्यातील 3,237 उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये होणार कैद होणार आहे.

विशेष म्हणजे, आता ईव्हीएममध्ये उमेदवारांच्या नावासह फोटो देखील आहे. तसेच यादीत सर्वांत खाली 'नोटा' (NOTA) बटणाचा पर्याय दिला आहे. जर यादीमध्ये दिलेल्या उमेदवारांपैकी एकही उमेदवार पसंत नसेल तर? तर अशावेळी नोटाचा पर्याय निवडणूक आयोगाने दिला आहे.

NOTA म्हणजे None Of The Above. यादीत असलेला वरीलपैकी कोणताच उमेदवार पसंत नसेल तर सर्वांत खाली 'नोटा' बटण असते. ते दाबले तर वरीलपैकी कोणताच उमेदवार पसंत नाही असे मत देता येते. सुरुवातीला 'नोटा'चा वापर 2013 मध्ये झाला. छत्तीसगड, मिझोरम, राजस्थान आणि मध्यप्रदेश, दिल्ली या ठिकाणी झालेल्या मतदानावेळी नोटाचा वापर करण्यात आला होता.

किती टक्के लोकांनी वापरलाय 'नोटा'चा पर्याय?गेल्या काही महिन्यांपूर्वी छत्तीसगड, राजस्थान, मध्यप्रदेश, मिझोरम आणि तेलंगणात मतदान झाले. त्यावेळी अंदाजे 1 ते 2 टक्के मतदारांनी नोटाचा वापर केला होता. निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरील माहितीनुसार, छत्तीसगडमध्ये सर्वाधिक दोन टक्के मतदारांनी, म्हणजेच सर्वाधिक 2,82,744 जणांनी 'नोटा'चे बटण दाबले होते. मध्यप्रदेशात 1.4 टक्के म्हणजेच 5,42, 295 जणांनी 'नोटा'चा वापर केला आहे तर राजस्थानात 1.3 टक्के म्हणजेच 4,67,781 जणांनी 'नोटा'चा वापर केला. तेलंगणात 1.1 टक्के म्हणजेच 2,24,709 जणांनी 'नोटा'ला पसंती दिली आहे. तर मिझोराममध्ये केवळ 0.5 टक्के म्हणजेच 2917 जणांनी 'नोटा'चा वापर झाला.

विशेष म्हणजे, 'नोटा'कडे अधिकाधिक मतदारांचा कल 2017 च्या गुजरात विधानसभेच्या निवडणुकीपासून दिसून येऊ लागला. या निवडणुकांत साडेपाच लाख मतदारांनी (जवळपास दोन टक्के मतदारांनी) 'नोटा' हा पर्याय निवडला होता. त्यानंतर 2018 मध्ये झालेल्या कर्नाटक निवडणुकांतही साडेतीन लाख मतदारांनी (एक टक्का मतदार) 'नोटा'चा वापर केला आणि सात विधानसभा मतदारसंघांतील निकालावर त्यांचा थेट परिणाम दिसून आला. 

टॅग्स :निवडणूकमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019