Join us

निलंबित आयपीएस कैसर खालिद यांचे पुढे काय?, तपासातील गूढ कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 01:55 IST

खालिद यांनी होर्डिंगला परवानगी दिली नसती तर ही दुर्घटना घडली नसती, असा सूर हाेता.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेला वर्ष पूर्ण झाले तरी संशयाच्या फेऱ्यात अडकलेले निलंबित तत्कालीन रेल्वे पोलिस आयुक्त कैसर खालिद यांच्यावर अद्याप कुठलीही कारवाई झालेली नाही. ती का झाली नाही? त्यांच्यावर कारवाई होणार का? हे गूढ कायम आहे. खालिद यांनी होर्डिंगला परवानगी दिली नसती तर ही दुर्घटना घडली नसती, असा सूर हाेता.

गेल्या वर्षी दि. १३ मे रोजी घडलेल्या या दुर्घटनेत १७ जणांचे बळी गेले तर, ७४ जण जखमी झाले होते. होर्डिंगला परवानगी देताना पदाचा गैरवापर, प्रशासकीय त्रुटी ठेवणे आणि परस्पर निर्णय घेणे, असा ठपका खालिद यांच्यावर ठेवण्यात आला होता. होर्डिंगच्या परवानगीनंतर खालिद यांच्या सांगण्यावरून जान्हवी मराठेने कंपनीच्या खात्यातून अर्शदला काही धनादेश दिल्याचे भिंडेने गुन्हे शाखेला सांगितले. परवानगीनंतर तीन महिन्यांत हे होर्डिंग उभे राहिले. गुन्हे शाखेने अर्शदच्या बँक खात्याचा लेखाजोखा तपासताच आतापर्यंत त्याच्या बँक खात्यात ५० लाखांहून अधिकचा व्यवहार झाल्याचे समोर आले.

ठोस पुरावे अद्याप हाती लागलेले नाहीत

विशेष म्हणजे ही रक्कम कंपनीने थेट अर्शदला न देता शिवाजीनगर, गोवंडीच्या झोपडपट्टीत राहणाऱ्या १५ ते २० व्यक्तींच्या बँक खात्यांवर जमा केली. गुन्हे शाखेने या व्यक्तींकडे चौकशी केली, तेव्हा त्यांच्या खात्यात आलेली रक्कम अर्शदने काढून घेतल्याचे स्पष्ट झाले. 

ही रक्कम कंपनीने का दिली असावी, याचा तपास करताना अर्शद आणि खालिद यांच्या पत्नीने मिळून डिझायनर पोशाखांचे उत्पादन करणारी कंपनी थाटली होती. या कंपनीत खालिद यांच्या पत्नी आणि अर्शद भागीदार संचालक होते, अशी माहिती गुन्हे शाखेच्या हाती लागली. 

मात्र तपासात खालिद यांच्या सहभागाबाबत ठोस पुरावे हाती लागलेले नसून तपास सुरू असल्याचे गुन्हे शाखेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. याप्रकरणात इगो मीडिया कंपनीचा संचालक भावेश भिंडे, माजी संचालक जान्हवी मराठे, जाहिरात फलकाच्या देखरेखीची जबाबदारी असलेला सागर पाटील व स्थापत्य अभियंता मनोज संघू यांना अटक झाली. 

 

टॅग्स :घाटकोपरमुंबई महानगरपालिका