जेलमध्ये घालायला ही काय मोगलाई आहे काय? - अजित पवारांचा तावडेंना टोला
By Admin | Updated: September 16, 2014 00:09 IST2014-09-16T00:05:14+5:302014-09-16T00:09:21+5:30
खोटी स्टेटमेंट करणे हा भाजपच्या नेत्यांचा स्वभावे

जेलमध्ये घालायला ही काय मोगलाई आहे काय? - अजित पवारांचा तावडेंना टोला
कोल्हापूर : ऊठसूट अजित पवार यांना जेलमध्ये घालायला ही काय मोगलाई आहे काय? असा सवाल करीत ‘खोटं बोल पण रेटून बोल’ या उक्तीप्रमाणे प्रसिद्धीसाठी खोटी स्टेटमेंट करणे हा भाजपच्या नेत्यांचा स्थायीभाव आहे, असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांना लगावला. गृहमंत्री झाल्यावर सिंचन घोटाळ्याप्रश्नी अजित पवार यांना जेलमध्ये घालू, असे वक्तव्य विनोद तावडे यांनी आज, मुंबई येथे केले होते. त्यांच्या या वक्तव्याकडे लक्ष वेधले असता, उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, भाजपचे नेते नेहमी खोटे बोलतात. त्यांच्या सांगण्यावरून राज्य सरकारने एसआयटी नेमली. त्यांच्याच सांगण्यावरून माधवराव चितळे समिती नेमली. समितीचा अहवाल जाहीर केला. कोणताही घोटाळा झाला नाही हे स्पष्ट झाल्यानंतरही जर भाजपचे नेते टीका करीत असतील तर तो त्यांचा खोटारडेपणा आहे.
निवडणुका आल्या की, ते असे बोलतात. १९९५ मध्ये निवडणुकीपूर्वी भाजपचे नेते दाऊद इब्राहिमला मुसक्या घालून भारतात आणणार, असे सांगत होते. सत्ता मिळाली पण दाऊदला काही आणला नाही. वेगळी वक्तव्ये करून प्रसिद्धी मिळविणे हा त्यांचा स्थायीभाव आहे. (प्रतिनिधी)
उमेदवार ठरलेत; १४४ जागांवर ठाम
पक्षाचे उमेदवार ठरले आहेत; परंतु कॉँग्रेसकडून काहीच हालचाली झाल्या नसल्याने पुढची चर्चा थांबलेली आहे. आघाडीची प्रक्रिया पुढे गेलेली नाही म्हणून उमेदवार जाहीर केले नाहीत. येत्या दोन-चार दिवसांत ते जाहीर केले जातील, असे पवार यांनी सांगितले. राष्ट्रवादी कॉँग्रेस १४४ जागांवर आजही ठाम असल्याचा दावा त्यांनी केला.
शिवसेना विकासाच्या विरोधात
शिवसेना ही नेहमी विकासाच्या विरोधात राहिली आहे. कोकणातील अणुऊर्जा प्रकल्पाला त्यांनी विरोध केला असला तरी आम्ही तो प्रकल्प पूर्ण करण्याचा निर्धार केला आहे, असे पवारांनी स्पष्ट केले.
‘कोल्हापूर उत्तर’ आमचाच
कोल्हापूर उत्तर मतदारसंघावर आम्ही दावा केला असून तो आम्ही घेऊच; परंतु या जागेवरून फारसा वादही वाढवायचा नाही, असे पवार म्हणाले.
टोलचा प्रश्न मुख्यमंत्र्यांशी संबंधित
शहरातील टोलच्या प्रश्नात मुख्यमंत्री चव्हाण यांनी लक्ष घातले आहे. अजूनही निर्णय झालेला नाही. टोलसंदर्भातील निर्णय घेणे हा त्यांचा अधिकार असल्याने
मी याबाबत बोलणे
योग्य होणार नाही, असे सांगत त्यांनी या प्रश्नाला बगल दिली.