Join us  

शिवरायांच्या पुतळ्याची उंची कसली मोजता?; उद्धव ठाकरेंचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2018 7:40 AM

शिवरायांच्या पुतळ्याची उंची महाराष्ट्रात कमी करताय? असा प्रश्न उपस्थित करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी फडणवीस सरकारला लक्ष्य केले. तसेच महाराष्ट्राच्या अस्मितेचा मुद्दा उचलून एकप्रकारे मराठी जनतेला आपलसं करण्याचा प्रयत्न केला आहे.

मुंबईः कृष्णाने गीता सांगितली, पण ती अमलात आणली आपल्या शिवाजी महाराजांनी. त्या शिवरायांच्या पुतळ्याची उंची महाराष्ट्रात कमी करताय?, असा सवाल करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा 'जय शिवाजी' हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा मुद्दा उचलला आहे.

शिवरायांचे स्मारक म्हणजे अभिमानाने छाती फुलून येईल आणि मान उंचावून सगळे बघतील असं व्हायला हवं. अहो, ते शिवराय आहेत! त्यांच्या पुतळ्याची उंची कसली मोजताय?, असा टोला त्यांनी सरकारला लगावला.

मुंबईतील अरबी समुद्रात साकारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकातील पुतळ्याची उंची कमी होणार असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती. खर्च कमी करण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतल्याचं समजलं होतं. त्यावरून पावसाळी अधिवेशनातही गोंधळ झाला होता. या संदर्भात, 'सामना'मधील मॅरेथॉन मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.    

उद्धव म्हणाले,  >> शिवरायांसाठी जे जे करणे शक्य आहे ते सगळे करा. कारण शिवराय नसते तर आपण कोण असतो? आपलं अस्तित्व तरी काय असतं? 

>> शिवरायांचं स्मारक भव्यदिव्य कराच, पण ते करताना तिथला पैसा इकडे वापरा असं काही म्हणण्यापेक्षा माझं म्हणणं आहे तेही करा आणि हेही करा. 

>> शिवरायांच्या उंचीचे नेतृत्व महाराष्ट्रात काय, पण देशातही निर्माण होणे शक्य नाही. होणारही नाही.

>> ते जाणते राजे वगैरे राजकारणातले सोडा हो, पण नेतृत्वाची ती उंची गाठली नाही. म्हणून शिवरायांच्या उत्तुंग उंचीचा पुतळा उभा करा. तर तेथेही वांदे.

>> मुळात शिवरायांच्या उंचीचे नेतृत्वच नाही. त्यांना स्मारकाची उंचीही पेलवणार नाही. राज्यकर्ते त्यांच्या उंचीचे पुतळे बनवत असतील.

>> शिवरायांचं स्मारक चांगलं भव्यदिव्य करायलाच हवं. याचा अर्थ असा नाही की, गडकिल्ल्यांकडे दुर्लक्ष करा.  

>> महाराष्ट्राला जसा शिवरायांचा अभिमान आहे तसा देशालाही आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराज नसते तर सगळा देशच हिरवा झाला असता.

टॅग्स :उद्धव ठाकरेछत्रपती शिवाजी महाराज