Join us
Daily Top 2Weekly Top 5

माध्यमांना निवडक माहिती देण्यामागे सीबीआयचा नेमका अजेंडा काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2020 06:37 IST

अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांचा थेट सवाल

अतुल कुलकर्णी।

मुंबई : कायदा व सुव्यवस्था राखणाऱ्या सीबीआय, ईडी सारख्या संस्थांनी निवडक माहिती माध्यमांना देण्यामागे काही तरी अजेंडा आहे. कोणाला तरी बदनाम करायचे आहे किंवा या गुन्ह्यातून जे निष्पन्न होईल. त्याच्याशी त्यांचे सोयरसुतक नसेल असाच याचा अर्थ निघतो, अशा शब्दांत ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांनी सुशांतसिंह प्रकरणात चालू असलेल्या तपासावर नाराजी व्यक्त केली. लोकमत यूट्यूबवरच्या ‘ग्राऊंड झिरो’ मुलाखतीत ते बोलत होते.

पोलिस, सीबीआय, ईडी यांना प्रसिद्धीचा रोग जडला आहे. तपासातील बारकावे प्रसार माध्यमांना दिले जातात. माध्यमं म्हणतात की, आमच्या सोर्सनी ही माहिती दिली. ईलेक्ट्रॉनिक मीडियाच्या तुलनेत प्रिंट मीडियाला हा रोग नाही. ते भानावर आहेत. ईलेक्ट्रॉनिक मीडिया गुन्ह्याच्या साक्षीदारांना पॅनलवर बोलावतात, त्यांची मुलाखत घेतात. तपास यंत्रणेला त्या साक्षीदारांनी दिलेला जबाब आणि विविध चॅनलला दिलेला जबाब यात तफावत असते. यातून फायदा आरोपीचा होतो. मग आरोपी उलट तपासणीत असे दाखवून देतो की, त्या साक्षिदारांनी विविध ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे जबाब दिले आहेत. न्यायालयात ते पटवून देतात आणि अमूक साक्षिदाराची साक्ष अविश्वसनीय मानावी असा युक्तिवाद होतो.या तपास यंत्रणांना दोन खडे बोल सुनवायला सरकार का मागे पुढे पाहते, याचे उत्तर मला सापडले नाही. त्यामुळे तपास यंत्रणांवर वेळीच लगाम घातला पाहिजे, असेही अ‍ॅड. निकम म्हणाले.व्हॉटसअ‍ॅॅप चॅट हा किती मोठा पुरावा?व्हॉटसअ‍ॅॅप चॅटला कायद्याने महत्त्व आहे. गुन्हा केला नाही हे सिद्ध करण्याची जबाबदारी फिर्यादीची असते. व्हॉटसअ‍ॅप चॅट हा न्यायालयांनी पुरावा म्हणून मान्य केला आहे. आता या प्रकरणात एनसीबीला त्या चॅटला पुष्टी देणारा पुरावा शोधावा लागेल.

टॅग्स :उज्ज्वल निकमअमली पदार्थ