सेलिब्रेशनसाठी पर्यटकांचे काय पण!

By Admin | Updated: December 20, 2014 22:49 IST2014-12-20T22:49:13+5:302014-12-20T22:49:13+5:30

आठवडाभर आलेल्या ख्रिसमसच्या सुट्ट्या अवघ्या काही दिवसांवर आल्याने विमानांचे भाडे गगनाला भिडले असून रेल्वे गाड्यांचे बुकिंग फुल्ल झाले आहे.

What do tourists do for celebration! | सेलिब्रेशनसाठी पर्यटकांचे काय पण!

सेलिब्रेशनसाठी पर्यटकांचे काय पण!

अनिकेत घमंडी ल्ल डोंबिवली
आठवडाभर आलेल्या ख्रिसमसच्या सुट्ट्या अवघ्या काही दिवसांवर आल्याने विमानांचे भाडे गगनाला भिडले असून रेल्वे गाड्यांचे बुकिंग फुल्ल झाले आहे. त्यामुळे खासगी बसचे भाडे दुपट्टीने वाढविण्यात आले आहे. दिल्ली, गोवा, हैदराबाद, बेंगळुरू आणि राजस्थानसह महाराष्ट्रातही पर्यटनाच्या विशेष ठिकाणी जाणाऱ्या गाड्या आणि विमानांना पर्यटकांचा सर्वाधिक प्रतिसाद मिळत आहे. काहीही करून कुटूंबासह बाहेरगावी जाऊन ख्रिसमस एन्जॉय कसा करता येईल, यासाठी मनसुबे रचण्यात येत आहेत.
दिवाळीनंतर ख्रिसमसमध्ये वातावारण सगळीकडे आल्हाददायक असल्याने बहुतांश पर्यटक याच कालावधीत लांब पल्ल्याच्या देशांतर्गत पर्यटनाला जातात. त्यामुळे या सुट्ट्यांचे नियोजन पर्यटक किमान सहा महिन्यांआधीपासूनच सुरू झाले असून ज्यांचे झालेले नाही त्यांची सर्वत्र लगबग दिसून येत आहे. दरवर्षीप्रमाणेच यंदादेखील रेल्वेबरोबरच पुण्याहून गोवा, चेन्नई, हैदराबाद, बेंगळुरू, दिल्लीला जाणारी ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येची बहुतांश कंपन्यांची विमाने फुल्ल झाली असून शिल्लक तिकिटे तिप्पट किंमतीला उपलब्ध आहेत.
विमानाचे काही महिने आधी तिकीट काढल्यास ते आणि रेल्वेतील टू टायर एसी सीटचे तिकीटाच्या रकमेत फारसा फरक परक पडत नसल्याने पर्यटक या विमान प्रवासाला प्राधान्य देत आहेत. मुख्य म्हणजे यात वेळेची बचत होत असल्याने पर्यटनाचा कालावधी वाढतो आहे. दरवर्षी विमानाने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढतेच आहे. अलिकडे पर्यटक अधिक चोखंदळ झाले असून व्यावहारीक विचार करून ते सुट्ट्यांचे नियोजन काही महिने आधीच करतात. मुख्यत: विमानाचे तिकीट स्वस्त मिळावे म्हणून तर काहींची रेल्वेचे रिझर्व्हेशनसाठी धावपळ सुरू असते. त्यामुळे लांबपल्ल्याच्या रेल्वेचे बुकींग सर्वात लवकर फुल्ल होते. या वर्षी देखील हीच परिस्थिती कायम असल्याने खासगी बस चालकांनी या मार्गांवर जाणा-या बसची संख्या वाढविली आहे.

४सर्वांनाच टूरवर जाता येत नाही. त्यामुळेच मग ठाणे जिल्हयातील विशाल समुद्र किनारा असलेले डहाणू, बोर्डी, हरिहरिश्वर, तारकर्ली, किहीम, पालघर या शिवाय कल्याण तालुक्यातील उल्हास, बारवी, काळू, भातसा नदी किनाऱ्यावरील फार्म हाऊस, रेस्टॉरंट, हॉटेल्स आदि ठिकाणी पर्यटक मोठ्या प्रमाणात जाणार आहेत. त्यामुळेच या व्यावसायिकांनी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विद्युत रोषणाईसह थर्टी-फर्स्टच्या संध्याकाळचे नियोजन सुरू केले आहे. यामध्ये संगीताची मैफिलही रंगणार आहेत.
४तालुक्यात ७० ते ८० च्या आसपास हॉटेल्स व रेस्टॉरंट आहेत. त्यांचेही बुकिंग सध्या सुरू आहे. जर ऐनवेळी बुकिंग हवे असल्यास दाम दुप्पटीने पैसे मोजावे लागणार आहेत. तर कोकणात व इतर ठिकाणी जाण्यासाठी ट्रॅव्हल्स कंपन्यांनी बुकिंगही जोरदार सुरू आहे, असे सांगितले. त्यामुळे गुलाबी थंडीत वर्षभराच्या कामाचा शिणवटा घालविण्यासाठी आणि नवीन वर्षाचे स्वागत उत्साहात करण्यासाठी आपणही तयारी सुरू करायला काय हरकत आहे.

गुलाबी थंडीत वर्षभराच्या कामाचा शिणवटा घालवून नव्या वर्षाचे स्वागत निसर्गाच्या सान्निध्यात आणि जवळचे नातेवाईक मित्र मैत्रिणी यांच्या सोबत मौजमजा करण्यासाठी मुंबईसह ठाणे,कल्याण येथील नागरिक सज्ज झाले असून त्यासाठी माथेरान, महाबळेश्वर, अलिबाग, नाशिकसह माळशेजघाट, कसाराघाट आणि नदी किनाऱ्यांवरील फार्म हाऊस बुकिंग करण्याची जोरदार तयारी सुरू झाली असून ऐनवेळी बुकिंग हवे असल्यास दामदुप्पट पैसे मोजावे लागतील, असे हॉटेल चालकांचे म्हणणे आहे.

नवीन वर्षाचे स्वागता मुंबईबाहेर निसर्गाच्या सान्निध्यात करण्याकडे लोकांचा कल वाढला. महाबळेश्वर, माथेरान, पाचगणी, माळशेज घाट, कसारा घाट, नाशिक या हिल स्टेशनबरोबरच अलिबाग, काशिद, दमण, वाईनगरी आणि राज्याच्या सीमेवरील सातपुडा या नव्या ठिकाणी जाण्याकडे मुंबईकरांचा कल वाढत आहे. थर्टी फर्स्टला मुंबईच्या गजबजाटापासून दूर शांत ठिकाणचा शोध मुंबईतील नागरिक घेत आहेत. त्यांच्याकडून तशी विचारणा होत असल्याचे टूर आॅपरेटर्सनी सांगितले.

 

Web Title: What do tourists do for celebration!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.