पवई तलावासाठी काय करणार?
By Admin | Updated: June 19, 2016 03:01 IST2016-06-19T03:01:24+5:302016-06-19T03:01:24+5:30
कधी एके काळी निसर्गरम्य असलेल्या पवईचे सौंदर्यच नष्ट करण्यात आले आहे. येथे असलेले जंगल नष्ट करून या ठिकाणी निवासी व व्यवसायिक संकुलांची उभारणी करण्यात आली.

पवई तलावासाठी काय करणार?
मुंबई : कधी एके काळी निसर्गरम्य असलेल्या पवईचे सौंदर्यच नष्ट करण्यात आले आहे. येथे असलेले जंगल नष्ट करून या ठिकाणी निवासी व व्यवसायिक संकुलांची उभारणी करण्यात आली. आता त्यापाठोपाठ येथील तलावही नष्ट करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या तलावाला वाचवण्यासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर उच्च न्यायालयाने तलावाला वाचवण्यासाठी काय पावले उचललीत? अशी विचारणा म्हाडा व मुंबई महापालिकेकडे केली.
पवई तलावाचे क्षेत्र कमी करण्यात आले असून, त्याचे रूपांतर मोठ्या तलावात झाले आहे. या तलावात कचरा टाकण्यात येतो, येथील रहिवासीही त्यांच्या घरातील कचरा या तलावात टाकतात, तसेच दिवसेंदिवस याचा आकारही कमी होत आहे. या तलावाला वाचवण्याचे व त्याचे पूर्वीचे रूप प्राप्त करून देण्याचा आदेश महापालिका व म्हाडाला द्यावा, यासाठी व्यवसायाने वकील असलेल्या एस.एस.जोशी यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणी न्या. शंतनू केमकर व न्या. एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठापुढे होती.
याचिकाकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी आरटीआयद्वारे मिळवलेल्या माहितीमध्ये महापालिकेने या तलावाच्या स्थितीबद्दल सर्व माहिती असल्याचे मान्य केले होते, तसेच या तलावाला मूळ रूप प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी विशेष समिती गठित करण्यात आली आहे, अशी माहिती याचिकाकर्त्यांना दिली होती. मात्र, ही समिती कागदावरच राहिली असल्याचे याचिकाकर्त्यांनी खंडपीठाला सांगितले.
याचिकेची गांभीर्याने दखल घेत, उच्च न्यायालयाने २१ जूनपर्यंत महापालिका आणि म्हाडाला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले. (प्रतिनिधी)
...तर तलाव नष्टच होईल
तलावाचे क्षेत्र कमी होणे, ही चिंतेची बाब आहे. वेळीच पावले उचलली नाहीत, तर हे तलाव एक दिवस नष्टच होईल, असे म्हणत खंडपीठाने महापालिकेने आणि म्हाडाने आतापर्यंत या तलावाला वाचवण्यासाठी काय उपाययोजना आखल्या, याची माहिती देण्याचे निर्देश दिले.