Join us  

अमेरिकेत जॉब ऑफर करणारी व्यक्ती व्हिसासाठी बँकेत पैसे जमा करण्यास सांगत असल्यास काय करावं?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2019 11:45 AM

तुम्हाला आलेली जॉब ऑफर बोगस असल्याची खात्री पटल्यास स्थानिक पोलिसांकडे तक्रार करा.

प्रश्न- मी अमेरिकेतून मिळालेली जॉब ऑफर स्वीकारली आहे. नोकरी देणाऱ्या व्यक्तीने मला ई-मेल केला असून बँक खात्यात पैसे जमा करण्यास सांगितलं आहे. मी पैसे जमा केल्यावर मला अमेरिकेचा टेम्पररी वर्क व्हिसा मिळेल, याची खात्री त्यांनी दिली आहे. ही प्रक्रिया कशी असते?

उत्तर- अमेरिकेच्या टेम्पररी वर्क व्हिसाच्या अर्ज प्रक्रियेसाठी कधीही पैसे देऊ नका. अमेरिकेचा व्हिसा खात्रीने देऊ असंं सांगणाऱ्यांवर अजिबात विश्वास ठेवू नका. 

अशा प्रकारचे घोटाळे होत असतात. तुम्हाला आलेली जॉब ऑफर खरी आहे की बोगस हे कसं ओळखाल? यासाठी कोणतंही सूत्र नाही. पण खालील गोष्टी नक्की लक्षात ठेवा.

नोकरीची ऑफर बोगस असल्यास तुम्हाला देण्यात आलेली माहिती अतिशय त्रोटक असेल. त्यात तुमच्या पदाचा, पगाराचा, कार्यालयाच्या ठिकाणाचा उल्लेख नसेल. याउलट नोकरीची ऑफर खरी असेल तर त्यात सर्व माहिती विस्तृतपणे दिलेली असेल.  दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे बोगस ऑफर असल्यास तुम्हाला एखादी रक्कम (हफत्याने किंवा एकाच वेळी) स्थानिक बँकेत जमा करण्यास सांगण्यात येईल. असं झाल्यास संभाव्य धोका ओळखा. खरीखुरी जॉब ऑफर देणाऱ्या व्यक्ती किंवा कंपन्या अशा प्रकारे नोकरीसाठी किंवा व्हिसासाठी पैसे मागत नाहीत. अमेरिकन व्हिसाशी संबंधित सर्व शुल्क अमेरिकन सरकार निश्चित करतं आणि स्वीकारतं. सध्याचं व्हिसा शुल्क आणि ते भरण्याची पद्धत तुम्ही www.ustraveldocs.com/in वर जाऊन तपासू शकता. 

अखेरची महत्त्वाची गोष्ट म्हणजे बोगस ऑफर देणाऱ्या व्यक्ती किंवा कंपन्या तुम्हाला थर्ड पार्टी वेबसाईट्स, ई-मेल किंवा फोनच्या माध्यमातून व्हिसासाठी अर्ज करायला सांगतात. अमेरिकन व्हिसासाठी अर्ज करायचा असल्यास तो केवळ www.ustraveldocs.com/in या वेबसाईटवर जाऊन करावा. व्हिसासाठी अर्ज करणाऱ्या सर्व व्यक्तींना अमेरिकेच्या दूतावसात येऊन मुलाखत द्यावी लागते. तुम्ही मुलाखतीत दिलेल्या उत्तरांवरून तेथील अधिकारी तुमच्या अर्जाचा विचार करतात. अमेरिकेतून जॉब ऑफर आल्यामुळे अनेकांना प्रचंड आनंद होतो. तो त्यांच्यासाठी खूप मोठा क्षण असतो. अशा प्रसंगी तुम्हाला जॉब ऑफर करणाऱ्या व्यक्तीने किंवा कंपनीने सर्व माहिती दिली आहे ना याची खात्री करून घ्या. त्याबद्दलचा अधिकाधिक तपशील मिळवण्याचा प्रयत्न करा.

तुम्हाला आलेली जॉब ऑफर बोगस असल्याची खात्री पटल्यास स्थानिक पोलिसांकडे तक्रार करा. यानंतर एफआयआरची प्रत अमेरिकेच्या मुंबईतील दुतावासाकडे (MumbaiF@state.gov) पाठवा.

टॅग्स :अमेरिकाअमेरिकाभारतव्हिसापासपोर्ट