गंगेच्या संवर्धनासाठी सरकारने काय केले? राजेंद्र सिंह यांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 02:52 AM2019-03-28T02:52:54+5:302019-03-28T02:53:18+5:30

गंगा नदीच्या संवर्धनाच्या नावाखाली २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीदरम्यान उमेदवारांनी खोटी आश्वासने देत विजय पदरात पाडून घेतला. मात्र जिंकून आल्यानंतर गंगा नदीच्या संवर्धनासाठी काहीच काम केले नाही.

What did the government do to promote the Ganges? Rajendra Singh's question | गंगेच्या संवर्धनासाठी सरकारने काय केले? राजेंद्र सिंह यांचा सवाल

गंगेच्या संवर्धनासाठी सरकारने काय केले? राजेंद्र सिंह यांचा सवाल

Next

मुंबई : गंगा नदीच्या संवर्धनाच्या नावाखाली २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीदरम्यान उमेदवारांनी खोटी आश्वासने देत विजय पदरात पाडून घेतला. मात्र जिंकून आल्यानंतर गंगा नदीच्या संवर्धनासाठी काहीच काम केले नाही. परिणामी, येत्या निवडणुकीत खोटी आश्वासने देत असलेल्यांना गंगा नदी क्षमा करणार नाही, अशी आगपाखड जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांनी केली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’शी बोलताना राजेंद्र सिंह यांनी गंगा नदीच्या संवर्धनासाठी केंद्रातल्या सरकारने काय केले? याचा पाढा वाचत गंगा नदीबाबतच्या खोट्या आश्वासनांवर प्रचंड टीका केली आहे.
राजेंद्र सिंह यांनी सांगितले की, २०१४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान नरेंद्र मोदी म्हणाले होते की, ‘मी गंगा नदीचा मुलगा आहे. गंगेला स्वच्छ करण्यासाठी मी काम करणार आहे.’ या गोष्टीस पाच वर्षे उलटून गेली. मात्र सरकारने गंगा नदीच्या स्वच्छतेसाठी काम केले नाही.
गंगेचे मंत्री २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीत म्हणत आहेत की, २०२० पर्यंत गंगेला स्वच्छ करू. मात्र हे साफ खोटे आहे. कारण मतांसाठी हे खोटे आश्वासन दिले जात आहे. २०१८ पर्यंत गंगा नदी स्वच्छ झाली नाही तर गंगेत समाधी घेतली जाईल, असे वक्तव्य एका लोकप्रतिनिधीने केले. त्यांनी एक ध्यानात ठेवावे ते म्हणजे गंगा नदी जसा विजय प्राप्त करून देते; तसा ती पराभवही करू शकते. परिणामी, खोट्या आश्वासनांचा लाभ सरकारला मिळणार नाही. आता हे सरकार जेवढे खोटे बोलेल, तेवढी त्यांची हानी होईल. २०१९ साली गंगा या सरकारचा पराभव करणार आहे. आता सरकारला खोटा प्रचार आणि प्रसार करणे बंद करावे लागेल, असेही राजेंद्र सिंह यांनी स्पष्ट केले.

नदी पूर्वीपेक्षा अस्वच्छ
गंगा पूर्वीपेक्षाही अस्वच्छ झाली आहे. तिच्या संवर्धनासाठी काहीच काम झालेले नाही. उलट हिमालयाच्या परिसरात गंगा नदीवर उच्च न्यायालयाने आदेश देऊनही बांध घालण्याचे काम सुरू आहे. सरकारने हे बांध रद्द केले पाहिजेत. तेव्हा कुठे गंगेचा प्रवाह सुरळीत होईल. बांध रद्द झाले नसल्याने गंगेचा प्रवाह सुरळीत नाही. निर्मलतेच्या नावाखाली घाट बांधले जात आहेत, असेही सिंह म्हणाले.

Web Title: What did the government do to promote the Ganges? Rajendra Singh's question

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई