हे वेडे साहस कशासाठी?
By Admin | Updated: August 29, 2015 23:53 IST2015-08-29T23:53:28+5:302015-08-29T23:53:28+5:30
सहा वर्षांपूर्वीचा तो दिवस आमचे कुटुंब कधीच विसरू शकणार नाही. दहीहंडीत माझा मुलगा दिनेश सहाव्या थरावरून खाली पडला आणि त्याच्या पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला. आधी केईएममध्ये

हे वेडे साहस कशासाठी?
- कल्पना संसारे
(जखमी गोविंदाची आई)
सहा वर्षांपूर्वीचा तो दिवस आमचे कुटुंब कधीच विसरू शकणार नाही. दहीहंडीत माझा मुलगा दिनेश सहाव्या थरावरून खाली पडला आणि त्याच्या पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला. आधी केईएममध्ये त्याला दाखल करण्यात आलं. नंतर आम्ही त्याच्यावर खाजगी हॉस्पिटलमधे उपचार केले. प्रकृती बरी होऊन पूर्ववत होण्यासाठी तब्बल अडीच वर्षे लागली.
तो काळ दिनेशसाठी वेदनादायी आणि आमच्यासाठी क्लेशकारक होता. सुरुवातीला मंडळातील मुलांनी बरीच धावपळ केली. उपचारासाठी आर्थिकही मदत केली. पण आर्थिक मदतीने शारीरिक यातना कमी होतात का? त्या संबंधिताला भोगाव्याच लागतात. आणि त्याच्या कुटुंबीयांना होणाऱ्या मानसिक त्रासाचं काय? त्या अडीच वर्षांत आमची ससेहोलपट झाली.
आता दिनेश पूर्णपणे बरा झालाय आणि सारे सावरलोय. पण तो अडीच वर्षांचा काळ आमच्यासाठी त्रासदायकच होता. तेव्हापासून उंच थराच्या
दहीहंड्या म्हटलं की धडकी भरते.
आता दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा देण्यात आलाय. पण त्याबाबतच्या नियमावलीचे पालन होईलच याची शाश्वती काय, असा प्रश्न मनाशी
येतोच. नऊ - नऊ थरांचा अट्टाहास कशासाठी? गेल्या काही वर्षांत सगळ््या मोठ्या दहीहंड्यांंचे आयोजक राजकारणीच असल्याचं पाहावयास मिळतं. आपल्या राजकारणाची पोळी
ते भाजत असतात. दहीहंडीचे व्यापारीकरणही वाढले आहे. तरुणांच्या जीवाची बाजी लाऊन हे सारं होत आहे. दहीहंहीचा खेळात समावेश झाल्याने नियम, सुरक्षेची साधने, विमा असे उपाय येतील. पण तरीही अपघात झाल्यास ते संबंधितांनाच भोगावे लागतील, हे साऱ्यांनीच लक्षात घ्यावे.
‘गोविंदा रे गोपाळा’ । म्हणत एकमेकांच्या खांद्यावर हात टाकून निघालेल्या पारंपरिक गोविंदांच्या रांगा, त्यांच्यावर पाणी ओतणारे आबालवृद्ध इथपासून ते नऊ-नऊ थरांच्या छाती दडपून टाकणाऱ्या दहीहंडींचा इव्हेंट अशा प्रवासानंतर राज्य सरकारने आता दहीहंडीचा साहसी खेळात समावेश केलाय. गेल्या काही वर्षांत जखमी गोविंदा, त्यातील लहान मुलांचा वापर असे मुद्दे ऐरणीवर आले. आता साहसी खेळ म्हणून मान्यता मिळाल्यानंतर दहीहंडी अधिकाधिक शिस्तबद्ध होत सीमोल्लंघन करण्याच्या पवित्र्यात आहे.
सुरक्षिततेच्या दृष्टीने मागदर्शक
सूचना
गोविंदा या खेळाच्या आयोजनाबाबतची नियमावली राज्य संघटनेने तयार करावी. त्यानुसार या खेळाच्या नियमांचे पालन करणे आयोजकांवर बंधनकारक राहील.
या स्पर्धेचे आयोजन या खेळाच्या राज्य संघटनेने ठरवून दिलेल्या नियमावलीप्रमाणे व दिलेल्या वेळापत्रकानुसार करणे बंधनकारक राहील. राज्य संघटनेने स्पर्धा आयोजनाबाबतचे वेळापत्रक दरवर्षी जुलै महिनाअखेर जाहीर करावे.
सहभागी स्पर्धकांनी या स्पर्धेचे आयोजन करीत असताना सुरक्षतेच्या दृष्टीने वापरायची प्रमाणित साधने व उपाययोजना याबाबतची यादी (वेस्टगार्ड, (टॉपरसाठी) हेल्मेट, सेफ्टी बेल्ट, सेफ्टी हारनेस इत्यादी.) राज्य संघटनेने जाहीर करावी.
स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक खेळाडूचा वैयक्तिक विमा संबंधित क्रीडा संघटनेने काढल्याचे हमीपत्र संबंधित संघ व्यवस्थापनाने देणे आवश्यक राहील. तसेच स्पर्धेचा विमा संबंधित स्पर्धा आयोजकांनी काढणे बंधनकारक राहील. तसेच स्पर्धेत सहभागी होण्यापूर्वी विम्याची कागदपत्रे सादर करावी लागतील.