मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांच्यावर चित्रित झालेल्या व लता मंगेशकर यांना गायलेल्या ‘कांटा लगा...’ या लोकप्रिय गाण्याच्या रिक्रिएटेड साँगमुळे प्रकाशझोतात आलेली, तसेच ‘बिग बॉस १३’मध्ये सहभागी झालेली शेफाली जरीवाला (४२) हिचे निधन झाले आहे. शेफालीची शुक्रवारी रात्री उशिरा अचानक प्रकृती बिघडली. तिच्या छातीत दुखू लागले. पती अभिनेता पराग त्यागी यांनी तिला रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी दाखल करण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले. पोस्टमार्टेमनंतर शेफालीच्या पार्थिवावर संध्याकाळी ओशिवरा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले..
गुजरातमधील अहमदाबाद येथे १५ डिसेंबर १९८२ रोजी जन्मलेल्या शेफालीच्या २००२ मधील ‘कांटा लगा...’ या गाण्याला युट्युबवर १०० मिलियन व्ह्यूज आहेत. ‘बिग बॉस १३’ सोबतच ‘नच बलिए’ या शोमध्येही ती सहभागी झाली होती. ‘मुझसे शादी करोगी’ या चित्रपटातही तिने काम केले होते. तीन दिवसांपूर्वीच तिने एक फोटोशूट केले होते. २००४ मध्ये तिने संगीतकार हरमीत सिंगसोबत पहिले लग्न केले. ५ वर्षांतच दोघांचा घटस्फोट झाला. २०१५ मध्ये तिने अभिनेता पराग त्यागीशी लग्न केले.
आठ जणांचे जबाब घेतले
अंबोली पोलिसांनी आठ जणांचे जबाब नोंदवले आहेत. मुंबई पोलिसांचे वैद्यकीय व फॉरेन्सिक पथक शेफालीच्या घरी गेले. तिच्या मृत्यूबाबत कोणीही घातपाताचा संशय व्यक्त केलेला नसला तरी, पोलिस पथक सर्व अनुषंगाने तपास करत आहेत.
‘बिग बॉस’चे घर शापित
‘बिग बॉस १३’चा विजेत्या सिद्धार्थ शुक्लाचे २०२१ मध्ये ४१व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ‘बिग बॉस ७’मधील प्रत्युषा बनर्जी हिने २४ व्या वर्षी आत्महत्या करीत २०१६ मध्ये जीवन संपविले.
‘बिग बॉस १४’मध्ये सहभागी भाजप नेता सोनाली फोगाटचे २०२३ मध्ये ४२व्या वर्षी हृदयविकाराने निधन झाले.
कन्नड ‘बिग बॉस ३’मधील जयश्री रमैया यांनी २०२०मध्ये आत्महत्या केली.