Join us  

शिवसेना, राष्ट्रवादीची आश्वासनपूर्ती, काँग्रेसच्या योजनांचे काय? - मिलिंद देवरा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2020 4:02 AM

महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने जनतेला दिलेल्या आश्वासनांवर काम सुरू केले आहे.

मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकारला सत्तेत येऊन आता दोन महिने झाले. या आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादीने प्रचारादरम्यान जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, काँग्रेसची दिलेल्या आश्वासनांबाबत अद्याप हालचाल दिसत नसल्याची तक्रार काँग्रेस नेते आणि माजी मंत्री मिलिंद देवरा यांनी केली. त्यांनी थेट काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनाच पत्र पाठवून काँग्रेसच्या धोरणांच्या अंमलबजावणीसाठी यंत्रणा उभारण्याची मागणी केली.महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने जनतेला दिलेल्या आश्वासनांवर काम सुरू केले आहे. आश्वासनपूर्तीसाठी विविध योजनांची अंमलबजावणीही सुरू झाली आहे. शिवसेनेने प्रतिष्ठेच्या केलेल्या मुंबईतील नाइटलाइफ, शिवभोजन थाळीला सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादीकडूनही पक्षाच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय पुढे रेटण्याचे काम सुरू आहे. या स्पर्धेत काँग्रेस मात्र मागे पडत असल्याचे चित्र आहे. याच मुद्द्यावर काँग्रेस नेते देवरा यांनी सोनिया गांधी यांना २४ जानेवारीला पत्र पाठविले. काँग्रेसची लोकसभा, विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान लोकांना दिलेली आश्वासने प्रत्यक्षात आणण्यासाठी हालचाल दिसत नसल्याची तक्रार त्यांनी यात केली.काँग्रेसने दिलेल्या आश्वासनांच्या पूर्ततेसाठी समिती नेमावी, अशी मागणीही त्यांनी पत्रात केली आहे. देशातील अन्य काँग्रेसशासित राज्यांत अशा समित्या आहेत. तेथील नेते व केंद्रीय नेत्यांचा समावेश असणाऱ्या या समित्यांमुळे निवडणूक आश्वासनांची पूर्तता जलद व परिणामकारक होत आहे. त्यामुळे समिती स्थापन करावी, अशी मागणी देवरा यांनी पत्रात केली.निवडणूक प्रचार काळात पक्षाचे तत्कालीन अध्यक्ष राहुल गांधी यांनी सत्तेत आल्यास मुंबईकरांना ५०० फुटांचे घर देण्याची घोषणा केली. झोपडपट्टी पुर्नविकास योजनेसह अन्य आश्वासनांना लोकांनी चांगल्या प्रकारे पसंती दिली. या आश्वासनांच्या पूर्ततेसाठी अद्याप कोणतेही पाऊल उचलण्यात आलेले नाही. २०१९च्या प्रचारात पूर्ण करता येतील, अशा विविध वास्तववादी घोषणा काँग्रेसने केल्या. त्यांची पूर्तता करणे आवश्यक असल्याचे देवरा यांनी पत्रात नमूद केले आहे.

टॅग्स :काँग्रेस