Join us  

राज्य सरकारकडून रेल्वे प्रवासासाठी ॲॅप, मोबाइल, नेट नसलेल्या लाेकल प्रवाशांचे काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2020 6:31 AM

Mumbai Local News : रेल्वे प्रवास करणारा केवळ अधिकारी वर्ग नाही. घरकामगार आहेत, माथाडी कामगार आहेत. कित्येक जणांकडे साधे मोबाइल नाहीत तर ते ॲण्ड्रॉइड माेबाइल कोठून आणणार

मुंबई : कोरोना नियंत्रणात येत असून आता मुंबईतील सर्वसामान्यांसाठीही लाेकल सेवा सुरू करावी, असा प्रस्ताव राज्य सरकारने रेल्वेला पाठवला आहे. दिवसभरात तीन टप्प्यांत सर्वांसाठी प्रवासाची मुभा देण्याची मागणी करण्यात आली आहेे. तर रेल्वे प्रशासनाने लाेकलमधील गर्दी टाळण्यासाठी आधी उपाययाेजना करा, अशी अट घातली. त्यानुसार, राज्य सरकारकडून सध्या प्रवाशांसाठी ॲपचे नियोजन सुरू असल्याचे सांगण्यात आले. पण ॲण्ड्रॉइड माेबाइल तसेच इंटरनेट न वापरणाऱ्या प्रवाशांचे काय, असा सवाल प्रवासी संघटनांनी केला आहे.राज्य सरकारच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही एक ॲप तयार करीत आहोत. प्रवासी संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी कलर कोडिंगवर काम सुरू आहे. त्यामुळे प्रवाशांची गर्दी होणार नाही. प्रवाशांना  कलर कोडिंग आणि ठरावीक वेळेचे तिकीट देण्यात येईल.मुंबई रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष मधू कोटीयन म्हणाले, कामगार वर्गातील बहुतांश लोकांकडे ॲण्ड्रॉइड मोबाइल नाही. घरकामगार, रोजंदारीवर काम करणाऱ्या अनेकांकडे साधे माेबाइल आहेत. शिवाय अनेकांना ॲप डाऊनलाेड करता येणार नाही.तर दिवा रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष ॲड. आदेश भगत म्हणाले, रेल्वे प्रवास करणारा केवळ अधिकारी वर्ग नाही. घरकामगार आहेत, माथाडी कामगार आहेत. कित्येक जणांकडे साधे मोबाइल नाहीत तर ते ॲण्ड्रॉइड माेबाइल कोठून आणणार, हा प्रश्न आहे. हा निर्णय सर्वसामान्यांसाठी नाही. 

ठरावीक वेळेचेच मिळणार तिकीटकाेराेना नियंत्रणात असला तरी त्याचा संसर्ग वाढू नये यासाठी सर्वसामान्यांकरिता लाेकल प्रवास सुरू करतानाच अनेक गाेष्टींचा विचार करण्यात येत आहेे. गर्दी टाळण्यासाठी तसेच प्रवासी संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी कलर कोडिंगवर काम सुरू आहे. त्यामुळे प्रवाशांची गर्दी होणार नाही. प्रवाशांना कलर कोडिंग आणि ठरावीक वेळेचे तिकीट देण्यात येईल, असे राज्य सरकारकडून  सांगण्यात आले. तर अद्याप ॲपचा प्रस्ताव आमच्यापर्यंत न आल्याने आताच याबाबत भाष्य करणे उचित ठरणार नाही, असे मत रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. 

टॅग्स :मुंबई उपनगरी रेल्वेलॉकडाऊन अनलॉकमुंबई