वीज लपंडावाने पश्चिम रेल्वे रखडली
By Admin | Updated: January 2, 2015 01:41 IST2015-01-02T01:41:38+5:302015-01-02T01:41:38+5:30
मध्य रेल्वेपाठोपाठ पश्चिम रेल्वेचाही गेल्या काही दिवसांपासून बोऱ्या वाजत असून, विद्युत पुरवठ्याच्या लपंडावामुळे पश्चिम रेल्वेचा बोऱ्या वाजल्याची घटना गुरुवारी घडली.

वीज लपंडावाने पश्चिम रेल्वे रखडली
मुंबई : मध्य रेल्वेपाठोपाठ पश्चिम रेल्वेचाही गेल्या काही दिवसांपासून बोऱ्या वाजत असून, विद्युत पुरवठ्याच्या लपंडावामुळे पश्चिम रेल्वेचा बोऱ्या वाजल्याची घटना गुरुवारी घडली. मुंबई सेन्ट्रल ते
चर्चगेट स्थानकादरम्यान घडलेल्या घटनेमुळे लोकल सेवेवर मोठा परिणाम झाला.
चर्चगेट ते मुंबर्ई सेन्ट्रल दरम्यान रात्री सव्वा आठच्या सुमारास अप आणि डाऊन धीम्या आणि जलद मार्गावर विजेचा लपंडाव सुरू झाला. यामध्ये ओव्हरहेड वायरला पुरवठा व्यवस्थित होत नसल्याने चर्चगेट ते विरार दरम्यान लोकल सेवेवर परिणाम होण्यास सुरुवात झाली.
चर्चगेटहून अंधेरीला जाणारी एक धीमी लोकल तर बराच वेळ थांबून राहिली. त्यामुळे धीम्या लोकलच्या रांगा लागल्या. त्याचप्रमाणे जलद लोकलचाही बोऱ्या वाजला. या दोन्ही स्थानकादरम्यान जाणाऱ्या लोकल अत्यंत धीम्या गतीने जात असल्याने लोकल गाड्यांना लेटमार्क लागत होता. वीस मिनिटांनी विद्युत पुरवठा पूर्ववत झाल्यानंतर लोकलचा वेग पूर्ववत झाला. मात्र या घटनेमुळे लोकल पंधरा ते वीस मिनिटे उशिराने धावत होत्या. (प्रतिनिधी)