मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावरील पश्चिम रेल्वे लाइनवर ३५ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. शनिवार दिनांक २६ एप्रिल दुपारी १ वाजल्यापासून सोमवार २८ एप्रि मध्यरात्री १२ वाजेपर्यंत कांदिवली आणि बोरीवली स्थानकादरम्यान ब्लॉक असणार आहे. कांदिवली आणि बोरीवली स्थानकादरम्यान पूल क्रमांक ६१ वर गर्डरिंगच्या कामासाठी कारशेड लाइनवर काम करण्यात येणार आहे. यामुळे अनेक मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांवर परिणाम होईल. काही लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही गाड्या उपनगरीय रेल्वेच्या जलद मार्गावरुन चालवण्यात येणार आहेत. यामुळे लोकल सेवेवरही परिणाम होणार आहे.
ब्लॉकदरम्यान पाचव्या मार्गावर धावणाऱ्या मेल आणि एक्सप्रेस गाड्या जलद मार्गावर वळवल्या जातील. यामुळे २६ एप्रिल रोजी ७३ आणि २७ एप्रिल रोजी ९० लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. अशा एकूण १६३ लोकल फेऱ्या रद्द असतील. त्यामुळे प्रवाशांना मोठ्या मनस्तापाला सामोरं जावं लागू शकतं. मेगाब्लॉकदरम्यान पाचव्या रेल्वे लाइनवरील गर्डर, कांदिवली कारशेड लाइन आणि ट्रॅकच्या पूर्वेकडील यार्ड लाइन बदलणे अशा कामांचा समावेश आहे. या कामांमुळे भविष्यात अधिक गाड्या सामावून घेण्यासाठी आणि रेल्वे नेटवर्कची क्षमता वाढवण्यास मदत होणार असल्याचं रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.