लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: पश्चिम रेल्वेने चर्चगेट ते विरारदरम्यानच्या मुंबई उपनगरीय विभागातील एकूण ६२३ अतिक्रमणे हटविली आहेत. एप्रिल २०२४ ते मे २०२५ या १३ महिन्यांमध्ये ही कारवाई करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
चर्चगेट ते विरारदरम्यान माहीम पूर्व, वांद्रे पूर्व, खार पूर्व, मालाड आणि कांदिवलीदरम्यान, बोरीवली-दहिसर, विरार खाण, नालासोपाराजवळ असलेले नाईल मोर आणि मोर गाव या भागात सर्वाधिक अतिक्रमणे असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या भागातील अतिक्रमणांवर कारवाई केल्यानंतर ती पुन्हा उभी राहत आहेत. त्यामुळे ही अतिक्रमणे प्रशासनासाठी डोकेदुखी ठरत असून, ती हटविण्यासाठी रेल्वेला मेहनत करावी लागते.
सर्वाधिक अतिक्रमणे होणारे विभाग
माहीम पूर्व, वांद्रे पूर्व, खार पूर्व, मालाड आणि कांदिवलीदरम्यान, बोरीवली - दहिसर, विरार खाण, नाईल मोर, मोर गाव.
अशी करतात अतिक्रमण विरोधी कारवाई
अतिक्रमण हटवण्यासाठी रेल्वेला मोठी तयारी करावी लागते. आरपीएफ, जीआरपी, शहर पोलिस आणि अभियांत्रिकी कर्मचाऱ्यांच्या समन्वयाने वारंवार कच्च्या स्वरूपाच्या अतिक्रमणांवर कारवाई केली जाते. आरपीएफच्या संमतीने मिळालेल्या अहवालात दिलेल्या सर्वेक्षणाच्या किंवा तक्रारीच्या आधारे ही कारवाई करण्यात येते. या कारवाईसाठी वेळ आणि तारीख निश्चित केल्यानंतर अतिक्रमणधारकांना तीन दिवस अगोदर सूचना दिली जाते. त्यानंतर पुरेशा मनुष्यबळ आणि यंत्रसामग्रीसह सुरक्षा दलांच्या चोख बंदोबस्तामध्ये अतिक्रमणे पाडण्याचे काम सुरू केले जाते.