Join us

प.रे.च्या प्रवाशांना प्लॅटफॉर्मवर उन्हात उभे राहण्याची ‘शिक्षा’

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2025 13:03 IST

उन्हाळा आला तरी विकासकामे पूर्ण होईनात, अरुंद जागेमुळे लोकल पकडताना कसरत

मुंबई : पश्चिम रेल्वेच्या अनेक रेेल्वे स्टेशनवरची कामे संथगतीने सुरू आहेत. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात प्लॅटफॉर्मवरचे छत गायब असल्याने प्रवाशांचे अक्षरश: हाल होत आहेत. या कामांमुळे अनेक ठिकाणी गाडी पकडण्यासाठी प्रवाशांना अतिशय अरुंद  जागेतून धावपळ करावी लागत असल्याने सुरक्षेचा निकषच धाब्यावर बसवण्यात आल्याचे चित्र आहे.

पश्चिम रेल्वेच्या दहिसर, कांदिवली, माहीम, दादर, मुंबई सेंट्रल, लोअर परळ, ग्रँट रोड या स्थानकांवर गेले कित्येक महिने ही कामे सुरू आहेत. कांदिवली स्थानकात डेक बांधण्याच्या कामामुळे फलाट क्रमांक १, २ आणि ३ वर प्रवाशांची गैरसोय होत आहे. लोअर परळ स्थानकात फलाट २ आणि ३ च्या मध्यभागी प्रवाशांना उभे राहण्यासाठी फक्त ४ ते ५ फुटांची जागा उरली आहे. या भागातून प्रवासी जीव मुठीत घेऊन जातात. मुंबई सेंट्रल आणि ग्रँट रोड स्टेशनवरदेखील अशीच परिस्थिती असून अनेक ठिकाणी फलाटांवरील छप्पर काढण्यात आले आहेत.

दहिसर स्थानकाच्या प्लॅटफॉर्म १ आणि २, तसेच माहीम स्टेशनच्या प्लॅटफॉर्म १, २ आणि ३ वरदेखील प्रवाशांची गैरसोय होत आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर दररोज सुमारे ३० ते ३२ लाख प्रवासी प्रवास करतात. स्टेशनवर सुरू असलेल्या विकासकामांमुळे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. प्लॅटफॉर्मवर काही ठिकाणी साधारण १०० मीटरपर्यंत छत नसल्याने प्रवाशांना उन्हाचा त्रास होत आहे. छत असलेल्या ठिकाणी थांबून ट्रेन आल्यावर ती पकडण्यासाठी प्रवासी धावपळ करतात. त्यामुळे अपघाताची भीती आहे.

१०० मीटरपर्यंत छत नसल्याने प्रवाशांचे हाल

पश्चिम रेल्वे आणि एमआरव्हीसी यांच्यासारख्या संस्था बजेट मिळून देखील कामे संथगतीने करत आहेत. त्यामुळे प्रवाशांना प्लॅटफॉर्मवर उन्हात उभे राहावे लागत आहे. काही महिन्यांत पावसाळा येत असून आता प्रवाशांना पावसात भिजत राहावे लागू नये. याची काळजी रेल्वेने घेणे अपेक्षित आहे - राजेश पंड्या,  उपाध्यक्ष, महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघ, पश्चिम रेल्वे

टॅग्स :मुंबईपश्चिम रेल्वे