Join us  

CoronaVirus: कोरोनामुळे रेल्वेला बसला 135 कोटींचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2020 4:31 PM

22 मार्चपासून लोकल सेवा बंद; 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन

मुंबई : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लोकल सेवा बंद केली आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वे प्रशासनाला तब्बल 135 कोटी रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे. कोरोनाचा प्रसार होऊ नये, यासाठी 22 मार्चपासून लोकल सेवा बंद करण्याचा निर्णय रेल्वे मंडळाने घेतला. त्यामुळे पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल सेवा बंद झाली. परिणामी, 22 मार्च ते 26 मार्च पर्यंत पश्चिम रेल्वेला 135 कोटी 66 लाखांचा फटका बसला आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या जनसंपर्क विभागाकडून देण्यात आली. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने रेल्वे मंत्रालयाने मुंबईची उपनगरीय लोकल, देशातील लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस, कोलकता मेट्रो 31 मार्चपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र 24 मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनामुळे 21 दिवस लॉकडाऊन करण्याची घोषणा केली. परिणामी, 14 एप्रिलपर्यंत लोकलसह लांब पल्ल्याच्या गाड्याही बंद राहणार आहेत.  त्यामुळे भारतीय रेल्वेचे याचा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. पश्चिम रेल्वे प्रशासनाच्या  प्रवासी वाहतुकीतून मिळणारे आणि इतर माध्यमातून मिळणारा महसूल सुद्धा बुडत आहे. 22 मार्चपर्यंत पश्चिम रेल्वेचा 78.50 कोटींचे उत्पन्न बुडाले होते. त्यानंतर 24 मार्च पर्यंत 107 कोटी आणि 26 मार्च पर्यंत 135 कोटी 66 लाख रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे. यापुढे 14 एप्रिलपर्यंत हा आकडा वाढत जाण्याची शक्यता आहे. पश्चिम रेल्वेला प्रवाशाच्या तिकीट दरासह इतर अनेक बाबीतून उत्पन्न मिळते. मात्र हे उत्पन्न आता मिळणे बंद झाले आहे. विनातिकीट प्रवासी, जाहिरात मधून पश्चिम रेल्वेला कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न मिळते. मात्र आता हे उत्पन्न बुडत असल्याची माहिती पश्चिम रेल्वेच्या जनसंपर्क विभागाकडून सांगण्यात आले.

टॅग्स :पश्चिम रेल्वेकोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस