Join us

Mumbai Local: पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत, माहिम स्थानकात पॉइंट बिघाड; फास्ट ट्रॅकवरील लोकल उशीराने

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 11:31 IST

Mumbai Western Line Local Train Update: मुंबईच्या पश्चिम रेल्वे मार्गावर जलद लोकल तब्बल १५ ते २० मिनिटं उशीराने धावत आहेत.

Mumbai Local Train Update:मुंबईच्यापश्चिम रेल्वे मार्गावर जलद लोकल तब्बल १५ ते २० मिनिटं उशीराने धावत आहेत. माहिम स्थानकात पॉइंट बिघाड झाल्यानं दादर ते अंधेरी आणि अंधेरी ते दादर अशा दोन्ही बाजूच्या जलद मार्गावरील लोकल यामुळे रखडल्या आहेत. 

वांद्रे आणि खार स्थानकादरम्यान तीन लोकल एकामागोमाग एक उभ्या आहेत. पश्चिम रेल्वेवरील या तांत्रिक बिघाडामुळे मुंबईकर चाकरमान्यांना ऑफिसमध्ये लेटमार्कला सामोरे जावे लागणार आहे. रखडलेल्या लोकलमधील प्रवासी आता रेल्व रुळावरुन चालू लागले आहेत. 

मंगळवारी हार्बर मार्गावरील लोकलसेवा तांत्रिक बिघाडामुळे विस्कळीत झाली होती. त्यामुळे प्रवाशांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला होता. तर मध्य रेल्वेवर दोनच दिवसांपूर्वी लोकलमधील गर्दीमुळे दुर्देवी घटना घडली होती. दोन लोकलमधील दरवाजावर लटकलेले प्रवासी एकमेकांना घासले गेल्यानं १० ते १२ प्रवासी धावत्या लोकलमधून खाली पडले होते. यात ६ जणांचा मृत्यू झाला तर इतर जखमी झाले. या घटनेनंतर मध्य रेल्वे प्रशासनाकडून काही महत्त्वाचे निर्णय घेतले गेलेत. ही घटना ताजी असतानाच आज पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकलसेवेत तांत्रिक बिघाडाला प्रवाशांना सामोरे जावे लागले आहे.

टॅग्स :पश्चिम रेल्वेमुंबई लोकलमुंबईलोकलमुंबई ट्रेन अपडेट