Join us
Daily Top 2Weekly Top 5

नालासोपारा रेल्वे रोको घटनेत पश्चिम रेल्वेने अज्ञात व्यक्तीवर केला गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2020 18:48 IST

प्रवाशांनी लोकलने प्रवास करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी रेल्वे रुळावर उतरून केली.

मुंबई : नालासोपारा येथील प्रवाशांना बुधवारी सकाळच्या सुमारास एसटीची सुविधा मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी थेट नालासोपारा रेल्वे स्थानक गाठले. पोलिसांनी यावेळी परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. पण प्रवाशांनी लोकलने प्रवास करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी करत रेल्वे रुळावर उतरून केली. या घटनेसंदर्भात पश्चिम रेल्वेने अज्ञात प्रवाशांविरोधात रेल्वे कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. 

बुधवारी सकाळी ८.२७ वाजता सामान्य प्रवाशांनी नालासोपारा रेल्वे स्थानकावर जाऊन रेल्वे रुळावर उतरले. साधारण २०० जणांनी लोकल काही वेळ थांबवून ठेवली. रेल्वे पोलीस आणि आरपीएफ यांनी सामान्य प्रवाशांना रेल्वे रुळावरून जाण्यास सांगितले. सध्या फक्त निवडक अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सुरु आहे. सामान्य प्रवासी प्रवास करू शकत नाही अशी समज पोलिसांनी प्रवाशांना दिली. त्यानंतर सर्व प्रवाशांना हटविण्यात आले. पश्चिम रेल्वेने या घटनेसंदर्भात अज्ञात प्रवाशांविरोधात रेल्वे कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी दिली.

नालासोपारा येथून बस स्थानकावरून दररोज १७० फेऱ्या सुटतात. मात्र प्रवासी सुमारे ६ हजार येतात. त्यामुळे फेऱ्या अपुऱ्या पडतात. अनेक गाड्यामध्ये २२ ऐवजी ५० प्रवासी प्रवास करतात. परिणामी, फिजिकल डिस्टंसिंगच्या नियमांचे उल्लंघन होताना दिसून येत आहे. बुधवारी, तीन ते चार हजार प्रवाशांनी गर्दी केली. येथून दररोज सकाळी अत्यावश्यक सेवेसाठी जाणाऱ्या व इतर कर्मचाऱ्यांसाठी एसटी बस सोडल्या जातात. नालासोपारा, वसई, विरार या भागातून दररोज सुमारे ३०० बस फेऱ्या केल्या जातात. अचानक गर्दी केलेल्या प्रवाशांपैकी बहुतांश प्रवासी हे त्यांच्या खासगी कार्यालयात कामासाठी जाणारे होते. त्या प्रवाशांनी अत्यावश्यक सेवेसाठी सोडल्या जाणाऱ्या बस मधून प्रवास करण्याची परवानगी द्या, अशी  मागणी केली. या प्रवाशांना फिजिकल डिस्टन्सिंग काटेकोर पालन करीत इथे त्वरित बस उपलब्ध करून देणे शक्य नसल्याचे स्थानिक एसटी प्रशासनाने सांगितले. पोलिसांनी हस्तक्षेप करून देखील प्रवाशांनी फिजिकल डिस्टन्सिंग नियम न पाळता बस स्थानकावर गोंधळ घालण्यास सुरुवात केला. त्यामुळे स्थानिक एसटी प्रशासनाने सुरक्षेची बाब म्हणून पोलिसांच्या सुचनेनुसार बसस्थानक तातडीने बंद केले होते, त्यानंतर सकाळी १०.३० वाजता बस फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. दरम्यान, प्रवाशांची गर्दी पाहून बस फेऱ्या सोडण्याचे नियोजन केले आहे. गुरुवारपासून प्रवाशांना जादा फेऱ्या उपलब्ध असतील, अशी माहिती एसटी महामंडळाचे वाहतूक खात्याचे महाव्यवस्थापक राहुल तोरो यांनी दिली. 

टॅग्स :लोकलमुंबईमुंबई लोकलनालासोपारा