हावलीसाठी वेसावे कोळीवाडा सज्ज
By मनोहर कुंभेजकर | Updated: March 22, 2024 19:48 IST2024-03-22T19:47:55+5:302024-03-22T19:48:32+5:30
डोक्यावर मडकी घेऊन पारंपारिक वेषात कोळी महिलांची निघणार नेत्रदीपक मिरवणूक.

हावलीसाठी वेसावे कोळीवाडा सज्ज
मुंबई : मुंबईतील सर्वात मोठा असणाऱ्या वेसावे कोळीवाडा हावली पारंपरिक पद्धतीने साजरी करण्यासाठी सज्ज झाला आहे. येत्या रविवार दि,24 मार्च रोजी रात्री डोक्यावर मडकी घेऊन पारंपारिक वेषात वेसावे गावातून कोळी महिलांची निघणारी नेत्रदीपक मिरवणूक तसेच विविध रूपे परिधान करून येथील कोळी बांधवानी सादर केलेली सोंगे हे येथील खास आकर्षण असून याचा आनंद लुटण्यासाठी वेसावकर सज्ज झाले आहे. विशेष म्हणजे विदेशी पर्यटक,विविध पक्षांचे राजकीय नेते आणि अनेक छायाचित्रकार देखिल येथील हावली उत्सव बघण्यासाठी दरवर्षी येथे आवर्जून येतात.
वेसावे कोळीवाड्यात हावलीची परंपरा काही औरच आहे.हावली निमित्त ' बाजार गल्ली कोळी जमात ' आणि ' मांडवी गल्ली कोळी जमाती' च्या महिलांची मडकी मिरवणुक काढण्याची पूर्वापार परंपरा आहे. रविवारी मध्यरात्री शिमग्याला गावच्या पाटलाने अग्नी दिल्या नंतर वेसावकर कोळी नृत्य करत जल्लोषात आनंदोत्सव साजरा करणार आहेत.गावाच्या राम मंदिराला प्रदक्षिणा घालून संपूर्ण गावांमध्ये या भव्य मिरवणूक काढल्या जातातअशी माहिती मच्छिमार नेते प्रवीण भावे यांनी लोकमतला दिली.
वेसावे गावामध्ये कोबार हावली ही उद्या रात्री दि,23 तारखेला आहे. त्याचा मान हा नवीन लग्न झालेल्या दांपत्याला दिला जातो आणि पाटलाचा मान मंडळाच्या अध्यक्षाला असतो तो दि,24 तारखेला आहे आणि या दोन्ही होळी संपूर्ण तेरी गल्ली पासून तर शिव गल्ली या भागातील एकूण आठ विभागांमध्ये आहेत. या विभागांमध्ये या दोन्ही होळीची पूजा करून होळीला अग्नी दिला जातो अशी माहिती त्यांनी दिली.
मुंबई सारख्या वेगाने बदलणाऱ्या शहरात देखील कोळी बांधवांनी आपली संस्कृती व परंपरा टिकवली आहे.यंदाच्या वर्षी मासेमारी हंगाम हा खूप वाईट परिस्थितीत आला आहे त्यामुळे मच्छीमार बांधव होळी कशी साजरी करायची या चिंते मध्ये येथील कोळी बांधव आहेत, तरीही पारंपरिक पद्धतीने आम्ही आमचे सण उत्सव आजही टिकून ठेवले आहेत अशी माहिती प्रवीण भावे यांनी दिली.
कोळी समाजाचा होळी उत्सव हा पारंपारिक पद्धतीने आम्ही पिढ्यानपिढ्या साजरा करत आलो आहोत आणि आणि आमच्या विभागातील सगळ्या लहान थोर महिला कोळी पोशाख परिधान करून डोक्यावर मडकी घेऊन सजून संपूर्ण गावांमध्ये आम्ही त्याची मिरवणूक काढतो. आमच्या विभागातील आणि मुंबईतील बरेचशे नागरिक मिरवणूक पाहण्यासाठी खास वेसावे कोळीवाड्यात येतात अशी माहिती बाजार गल्ली कोळी समाज संस्था अध्यक्ष मयूर फोका व मांडवी गल्ली कोळी समाज संस्था अध्यक्ष वीरेंद्र मासळी यांनी दिली.
शिमगा हा कोळी बांधवांचा महत्वाचा सण असल्यामुळे या दिवसाचे महत्व म्हणजे कोळी राजा आपल्या होड्यांची रंगरंगोटी करून त्यावर छान रंगीत बावटे (झेंडे), पताके व मखमली झालर लावून सजावट करतो. त्याचप्रमाणे धुळवडीला संध्याकाळी होडीची पूजा देखिल केली जाते. सोबत गोड शेव, उकडलेले रताळे व इतर मिठाई असते. पूजा झाल्यानंतर छोटी मुलं फटाके फोडण्यात जणू रंगूनच गेली होती अशी माहिती कोळी महासंघाचे सरचिटणीस राजहंस टपके यांनी दिली.