Join us

भावाला वाचवायला गेला, अन् स्वत: समुद्रात बुडाला; सुट्टी लागल्याने आला होता मावशीकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2023 16:21 IST

साहिल त्रिभुवन असे या मृत मुलाचे नाव असून तो मूळचा छत्रपती संभाजीनगर येथील राहणारा आहे.

नालासोपारा : समुद्रकिनारी क्रिकेट खेळताना बॅटने जोरदार टोलवलेला चेंडू समुद्राच्या पाण्यात गेला. तो बाहेर काढण्यासाठी गेलेला भाऊ बुडताना पाहून त्याला वाचवायला गेलेल्या सतरा वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना वसईत भुईगाव समुद्रकिनारी शनिवारी संध्याकाळी घडली आहे. 

साहिल त्रिभुवन असे या मृत मुलाचे नाव असून तो मूळचा छत्रपती संभाजीनगर येथील राहणारा आहे. सुटी असल्याने काही दिवसांपूर्वी तो नालासोपाऱ्यात आपल्या मावशीकडे आला होता. रविवारी रात्री तो छत्रपती संभाजीनगर येथे परतीच्या प्रवासासाठी निघणार होता. त्या अगोदरच त्याच्यावरती काळाने घाला घातला आहे. आयुष्यात पहिल्यांदाच समुद्र पाहिल्यामुळे तो हरखून गेला होता. शनिवारी संध्याकाळी साहिल दोन मावस भावांसह भुईगाव समुद्रकिनारी क्रिकेट खेळण्यासाठी गेला. यावेळी पाण्यात गेलेला चेंडू काढण्यासाठी साहिलचा भाऊ पाण्यात उतरला असताना तो बुडू लागला. त्याला वाचवण्यासाठी साहिल धावून गेला, मात्र साहिलचाच पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही माहिती कळताच वसई पोलिस व पालिका अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले होते. 

टॅग्स :पाण्यात बुडणेमुंबई