Join us

बचावासाठी गेला आणि जीव गमावला! चार आरोपींना अटक, चुनाभट्टी पोलिसांची कारवाई

By मनीषा म्हात्रे | Updated: August 28, 2023 19:57 IST

पोलिसांत तक्रार दिल्याच्या रागात चुनाभट्टीमध्ये झालेल्या चाकू हल्ल्यात बचावासाठी पुढे गेलेल्या तरुणाला जीव गमवावा लागल्याचे समोर आले आहे.

मुंबई : पोलिसांत तक्रार दिल्याच्या रागात चुनाभट्टीमध्ये झालेल्या चाकू हल्ल्यात बचावासाठी पुढे गेलेल्या तरुणाला जीव गमवावा लागल्याचे समोर आले आहे. या हल्ल्यात दोन जण गंभीर जखमी झाले आहे. चुनाभट्टी पोलिसांनी एका अल्पवयीनासह चार आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. फुजेल इद्रीसी, जैद सय्यद, हलीम खान आणि हारूण कुरेशी अशी अटक आरोपींची नावे आहेत. तर, १६ वर्षीय अल्पवयीन आरोपीची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. याप्रकरणात आणखी १० आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

कुर्ला पुर्वेकडील कुरेशीनगरमध्ये एकत्र कुटुंबात राहण्यास असलेले सिकंदरअली कुरेशी यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, परिसरातील अल्मास खान, जिशान खान, आमीर खान, शाहबाज सय्यद ऊर्फ मोनु हे गुंडागर्दी करुन नागरिकांना धमकावत असतात. २८ जानेवारीला अल्मास खान आणि त्याच्या साथिदारांसोबत सिकंदरअली यांचा वाद झाला होता. त्यानंतर सिकंदरअली यांनी पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ४ एप्रिलला अल्मास खान याच्यासह त्याचे नातेवाईक आणि साथिदारांनी सिकंदरअली यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. मात्र ते थोडक्यात बचावले. त्यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी आणखी एक गुन्हा दाखल केला.

३१ जुलैला सिकंदरअली यांचा भाऊ समशेरअली हा घरी येत असताना अकबर खान आणि त्याच्या दोन मुलांनी चाकू दाखवून ठार मारण्याची धमकी दिली होती. सिकंदरअली यांच्या १६ वर्षीय भाच्याला २६ ऑगस्टला फुजेल कुरेशी, आवेश कुरेशी, झैद कुरेशी, इजाज कुरेशी, झैद मदनी, अकबरउल्लाह खान आणि अन्य साथिदारांनी अडवून मारहाण करत चाकू हल्ला केला. तो रक्तबंबाळ अवस्थेत घरी परतला असतानाच आणखी एका १६ वर्षीय भाच्यावर अकबरउल्लाह खान याने चाकू हल्ला केला. त्याला वाचविण्यासाठी सिकंदरअली आणि भाऊ साजिदअली पुढे आले. हल्लेखोरांनी त्यांच्यावर चाकूने सपासप वार केले. यामध्ये साजिदअली यांचा मृत्यू झाला आहे.  या आरोपींचा शोध सुरु...आरोपी अकबरउल्लाह खान, दिलशाद खान, फुजेल कुरेशी, आवेश कुरेशी, इजाज कुरेशी आणि त्याची पत्नी, झैद कुरेशी, हलिमा खान, शिफा खान, साहील कुरेशी यांचा शोध पोलीस घेत आहेत. तसेच, त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमीही तपासण्यात येत आहे. 

टॅग्स :मुंबईगुन्हेगारीअटक