म्हाडाचे घर स्वस्तात मिळवून देण्याचे प्रलोभन दाखवत एका नोकरदाराची तिघांनी ७ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार मालाड परिसरात उघडकीस आला आहे. आरोपींनी त्यांना म्हाडाच्या नावाने पाठवलेला ई-मेलही बोगस असल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी मालाड पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदार तुषार भोंडवे (३२) हे घर खरेदीच्या प्रयत्नात होते. भोंडवे यांचा कंपनीतील सहकारी उदय काळे (३२) याने त्याचा नातेवाइक सतीश नाडर (३३) हा कंत्राटदार असून त्याच्या ओळखीतून म्हाडाचे घर स्वस्तात मिळवून देईल, असे सांगितले.
कांदिवलीच्या महावीरनगर येथील इमारतीत १५ व्या मजल्यावर घर मिळवून देतो, असे आश्वासन नाडरने त्यांना दिले. भोंडवे यांनी नोव्हेंबर २०२४ मध्ये महावीरनगर येथे भेट दिली असता साप्ताहिक सुट्टीमुळे म्हाडाचे ऑफीस बंद असल्याने घर दाखवता येणार नाही, असे नाडर त्यांना म्हणाला. नाडरने भोंडवे यांची ओळख अन्य आरोपी निजाम शेख याच्याशी करुन देत तो म्हाडातील अधिकारी असल्याचे सांगितले.
सात लाख तीन हजार रुपये टप्प्याटप्प्यांत दिले१. शेख याने ३७ रुपयांमध्ये ३०५ चौरस फुटांचे घर देण्याचे प्रलोभन दाखविले. या घरांसाठी ११ लाख रुपये स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशनसाठी लागतील. तर उर्वरित पैशांसाठी मी कर्ज मिळवून देतो, असे आश्वासन दिले.
२. भोंडवे यांनी टप्प्याटप्प्यांत सात लाख तीन हजार रुपये त्याला दिले. मात्र, विविध कारणे देत पुढील प्रक्रिया त्याने टाळायला सुरुवात केली. भोंडवे यांचा विश्वास बसावा, यासाठी आरोपींनी त्यांना डिसेंबर २०२४ मध्ये एक ई-मेल पाठवला.
३. भोंडवे यांना ई-मेलबाबत संशय आल्याने म्हाडा कार्यालयात चौकशी केली असता फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानुसार त्यांनी तिघांविरोधात तक्रार दिली. पोलिसांनी त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कायद्याचे कलम ३(५), ३१८ (४) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.