Join us
Daily Top 2Weekly Top 5

हाेळीनिमित्त कुटुंबासाठी पुरणपोळी आणायला गेले, येताना पाण्याने भरलेला फुगा डोक्याला लागून मृत्यू 

By गौरी टेंबकर | Updated: March 8, 2023 10:34 IST

सोमवारी रात्री हा धक्कादायक प्रकार घडला. 

मुंबई : होळी साजरी करण्यासाठी दुकानातून कुटुंबासाठी पुरणपोळी आणताना दिलीप धावडे (४१) या शेअर ट्रेडिंग कंपनी कर्मचाऱ्याचा पाण्याने भरलेला फुगा डोक्याला लागल्याने मृत्यू झाला. सोमवारी रात्री हा धक्कादायक प्रकार घडला. 

विलेपार्ले पूर्वच्या शिवाजीनगरमधील सिद्धिविनायक सोसायटीत पत्नी व दोन मुलांसोबत धावडे राहत होते. स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ते सोमवारी रात्री १०:३०च्या सुमारास कुटुंबासाठी पुरणपोळी घेऊन येत असताना लहान मुले व मोठ्या माणसांचा गट एकमेकांवर पाणी भरलेले प्लॅस्टिकचे फुगे येणाऱ्या जाणाऱ्यांच्या अंगावर फेकत होते. त्यातीलच एक फुगा धावडे यांच्या डोक्याला लागला आणि ते थेट खाली कोसळले. स्थानिकांनी धावडेंना खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र  डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. पोलिस उपनिरीक्षक भरत गुरव घटनास्थळी पोहोचले. अपघाती मृत्यूची नोंद करत धावडे यांचा मृतदेह कूपर रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. हा प्रकार जिथे घडला त्याठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत, त्यामुळे नेमके काय घडले याबाबत प्रत्यक्षदर्शीकडे चौकशी सुरू आहे. 

लेकरांच्या डोक्यावरील छत्र हरपले...माझ्या भावाला पाण्याचा फुगा लागून तो जखमी झाला ज्यात त्याचा जीव गेला. पोलिसांनी जबाब नोंदवला आहे. माझा भाऊ विवाहित असून, त्याची पत्नी दर्शिका आणि दोन मुले स्वरा (१२) आणि गौरेश (७) यांच्यासोबत राहत होता, लेकरांच्या डोक्यावरील छत्र कायमचे हरपले आहे. शशिकांत धावडे, मृताचे भाऊ

टॅग्स :मुंबईहोळी 2023