मुंबई : लोणावळा आणि अलिबाग येथील व्हिला बुकिंगच्या नावाखाली खारमधील दोघांची ऑनलाइनद्वारे ६० हजार आणि ५९ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी प्रियांका जैन आणि सुनील वॉरियर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा नोंदवला आहे.
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
जैन यांनी कुटुंबीय व नातेवाइकांसह १५ ते १७ ऑगस्टदरम्यान लोणावळा येथे जाण्याचे नियोजन केले होते. इन्स्टाग्राम आयडीवरून त्यांनी ‘व्हिवांटा स्टेज ऑफिशियल’ या आयडीवरील मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. संबंधिताने १८ जणांसाठी तीन दिवसांकरिता व्हिला बुकिंगचे एक लाख ३० हजार ३२ रुपये शुल्क सांगितले.
जैन यांनी बुकिंगसाठी १८ जुलैला ॲडव्हान्सपोटी ऑनलाइन पैसे पाठवले. मात्र, १५ ऑगस्टला तेथे जाण्यासाठी निघाल्यावर त्यांना बुकिंग रद्द झाल्याचा मेसेज मिळाला. तसेच पुढील तारखेसाठी बुकिंग करून देण्याचे सांगत रिफंडचीही हमी देण्यात आली. जैन यांनी रक्कम परत मागितली असता, रिफंड प्रक्रियेत असल्याचे सांगत त्याचा फोटोही पाठवला गेला. परंतु, पैसे परत न मिळाल्याने त्यांनी तक्रार दाखल केली.
इन्स्टाग्राम आयडीवरून नोंदणी महागात
सुनील वॉरियर यांनी ‘कॉन्सेप्ट _स्टेज’ या इन्स्टाग्राम आयडीवर संपर्क साधून अलिबाग येथे दोन दिवसांसाठी व्हिला बुकिंग करण्यास सांगितले. त्याकरिता त्यांनी ५९ हजार रुपये भरले.
मात्र, व्हिला तसेच पैसेही परत न मिळाल्याने फसवणूक झाल्याचा त्यांना संशय आला. याप्रकरणी त्यांनी खार पोलिसांत तक्रार दिली.