खालापूरात विहिरी पडल्या कोरड्या

By Admin | Updated: February 13, 2015 22:32 IST2015-02-13T22:32:30+5:302015-02-13T22:32:30+5:30

आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार, अशी परिस्थिती सध्या खालापूर तालुक्यातील निंबोडे-दांडवाडी गावात आहे. विहिरीत पाणीच नसल्याने येथील महिलांना

The well has dried well | खालापूरात विहिरी पडल्या कोरड्या

खालापूरात विहिरी पडल्या कोरड्या

अमोल पाटील, खालापूर
आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार, अशी परिस्थिती सध्या खालापूर तालुक्यातील निंबोडे-दांडवाडी गावात आहे. विहिरीत पाणीच नसल्याने येथील महिलांना पाणी मिळविण्यासाठी रात्रभर जागावे लागत आहे.
तालुक्याचे ठिकाण असलेल्या खालापूर ग्रामपंचायतीच्या हद्दीत या आदिवासी वसाहत असून हाकेच्या अंतरावर १२ महिने वाहणारी पाताळगंगा नदी गेली असतानाही येथील महिलांना मात्र पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. फेब्रुवारी महिन्यातच येथे तीव्र पाणीटंचाई असून याकडे लक्ष द्यायला कोणालाही वेळ नसल्याने संताप व्यक्त होत आहे.
खालापूर हे तालुक्याचे ठिकाण आहे. या ग्रामपंचायतीच्या हद्दीत निंबोडे-दांडवाडी ही शंभर-सव्वाशे घरांची आदिवासी वसाहत आहे. या वाडीपासून काही अंतरावरच द्रुतगती महामार्ग आहे. मुंबई-पुणे ही शहरे जोडण्यासाठी व जलदगतीने विकास करण्यासाठी या मार्गाची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र मुंबईपासून काही किमी अंतरावर असलेल्या या वाडीत भीषण पाणीटंचाई असतानाही लोकप्रतिनिधी किंवा शासकीय अधिकाऱ्यांचे या वाडीकडे अद्याप लक्ष गेलेले नाही.
एकीकडे विकासाच्या गप्पा मारणारे सरकार आदिवासीवाडीतील नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देऊ शकत नाही. या वाडीला लागूनच पाताळगंगा नदी वाहते. १२ महिने दुथडी भरून वाहणाऱ्या या नदीच्या पाण्यावर अनेक लहानमोठे कारखाने सुरू आहेत. आदिवासींना मात्र पिण्यासाठी पाणीही मिळत नाही. शंभराच्यावर आदिवासी समाजाची घरे या वाडीत आहेत. पिण्याचे पाणी नसल्याने एक किमी अंतरावर असलेल्या विचारेवाडीतून पाणी आणावे लागते. त्यासाठीही रात्रभर जागावे लागते, अशी माहिती येथील सुनंदा वाघमारे, विमल नाईक, वनिता नाईक आणि शकुन वाघमारे या महिलांनी दिली.
वाडीजवळ एक विहीर व एक विंधन विहीर आहे, मात्र पाणी नसल्याने या ठिकाणी रात्रभर जागून फक्त हंडाभर पाणी मिळते. निवडणुका आल्या की टँकरने पाणीपुरवठा करणारे राजकीय पुढारी निवडणुका संपल्या की ढुंकूनही पाहत नाहीत, अशा प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली.

Web Title: The well has dried well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.