Join us  

शरद पवार-प्रशांत किशोर भेटीचं स्वागत, शिवसेनेनं सांगितलं राजकारण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2021 5:35 PM

बाळासाहेबांनाही राष्ट्रीय पातळीवर मराठी माणूस हवा होता. महाविकास आघाडी ही शरद पवारांच्या नेतृत्वात निर्माण झालीय. त्यामुळं शरद पवार पंतप्रधान झाल्यास आम्हाला आनंदच होईल, असं अरविंद सावंत यांनी म्हटलं आहे.

ठळक मुद्देबाळासाहेबांनाही राष्ट्रीय पातळीवर मराठी माणूस हवा होता. महाविकास आघाडी ही शरद पवारांच्या नेतृत्वात निर्माण झालीय. त्यामुळं शरद पवार पंतप्रधान झाल्यास आम्हाला आनंदच होईल, असं अरविंद सावंत यांनी म्हटलं आहे.

मुंबई - राजकारण्यांचा हुकमी एक्का म्हणून ओळख असणाऱ्या प्रशांत किशोर आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी भेट झाली. भाजपचे फाइंड असणाऱ्या किशोर यांनी गेल्या निवडणुकीत शिवसेनेसाठी काम केलं होतं. आता, हेच प्रशांत किशोर राष्ट्रवादीच्या पवारांना भेटायला आल्याने काही नवीन गणिते जुळत आहेत का याची चर्चा रंगली होती. यासंदर्भात शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत यांनी आपलं मत माडलं आहे. शिवसेनेकडून या भेटीचं स्वागत करण्यात आलं आहे.

बाळासाहेबांनाही राष्ट्रीय पातळीवर मराठी माणूस हवा होता. महाविकास आघाडी ही शरद पवारांच्या नेतृत्वात निर्माण झालीय. त्यामुळं शरद पवार पंतप्रधान झाल्यास आम्हाला आनंदच होईल, असं अरविंद सावंत यांनी म्हटलं आहे. तसेच, शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्या भेटीचं स्वागतच आहे. देशात एककल्ली कारभार सुरू आहे. देशहितासाठी चांगला विरोधी पक्ष आणि पर्याय आवश्यक आहे. काँग्रेसच्या वाताहातीमुळं भाजपचं फावलं. राजकारणात सर्वाधिक अनुभवी आणि अभ्यासू शरद पवार आहेत. शिवसेना ही दिलेला शब्द पाळणारी आहे. त्यामुळे शरद पवारांनीही तो विश्वास व्यक्त केलाय. त्यांनी शिवसेनेचे कौतुक केलंय, असंही सावंत यांनी म्हटलं.

दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल साडे तीन तास चर्चा

शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक निवासस्थानी प्रशांत किशोर सकाळी पोहोचले. त्यानंतर प्रशांत किशोर यांनी पवारांसोबत जेवणही केलं. या दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल साडे तीन तास चर्चा झाली. या भेटीदरम्यान काही काळ राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलही उपस्थित राहिले. ही भेट संपल्यानंतर शरद पवार आमदार रोहित पवार यांच्यासह पुण्याच्या दिशेनं रवाना झाले. 

भेटीमागे राजकारणाचा विषय नाही

राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या भेटीमागे कोणतेही राजकारण नसल्याचं म्हणलं आहे. पवार म्हणाले, "या भेटीमागे काही राजकारण नाही. स्वतः प्रशांत किशोर यांनीच हे जाहीर केले आहे की ते आता राजकीय रणनीतीकार म्हणून काम करणार नाहीत. त्यामुळे राजकारण करण्याचा संबंध येतच नाही. पवार साहेब अनेकांना भेटत असतात. वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांची भेट होत असते, तशीच ही भेट आहे", असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.  

टॅग्स :शरद पवारराष्ट्रवादी काँग्रेसप्रशांत किशोर