Join us
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठ, महाविद्यालयीन कार्यक्रमांत ‘राष्ट्रगीत’ घोषणेचे राम नाईक यांच्याकडून स्वागत  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2020 21:30 IST

विद्यापीठे व महाविद्यालयांतील कार्यक्रमांची सुरुवात राष्ट्रगीताने करण्याच्या उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या घोषणेचे उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल व भाजपा जेष्ठ नेते  राम नाईक यांनी स्वागत केले आहे.  

मुंबई : विद्यापीठे व महाविद्यालयांतील कार्यक्रमांची सुरुवात राष्ट्रगीताने करण्याच्या उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या घोषणेचे उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल व भाजपा जेष्ठ नेते  राम नाईक यांनी स्वागत केले आहे.  सदर घोषणेचे वृत्त समजताच  नाईक यांनी उदय सामंत यांना दूरध्वनी केला व पत्र पाठवूनही अभिनंदन केले आहे.

अजूनही अनेक ठिकाणी जन गण मन हे राष्ट्रगीत व वंदेमातरम् हे राष्ट्रगान यांच्याबाबत उदासिनता दिसते.  देशाचा अभिमान व अस्मिता असलेल्या या गीतांना खऱ्या अर्थाने सर्वमान्यता मिळावी यासाठी जनप्रतिनिधींनी विशेष प्रयत्न केले पाहिजेत असे आपले मत असल्याचे सांगून राम नाईक म्हणाले, “1991 मध्ये लोकसभेत केरळातील के. एच. मुनियप्पा व  मुमताज अन्सारी या 2 खासदारांनी काही शैक्षणिक संस्थांमध्ये ‘वंदेमातरम्’ व ‘जनगणमन’ गायले जात नाही याबद्दल प्रश्न विचारला होता.  त्याबाबत 9 डिसेंबर 1991 रोजी मी संसदेत चर्चा उपस्थित केली.  चर्चेत ‘वंदेमातरम्’ व ‘जनगणमन’ ची प्रतिष्ठा कायम ठेवण्यासाठी संसदेने जनप्रतिनिधींनी प्रयत्न केले पाहिजेत असे विचार मी मांडले होते. त्यानंतर त्यासाठी या दोन्ही गीतांचे थेट संसदेतच गायन व्हावे यासाठी विशेष प्रयत्नही केले.  संसदीय समितीत, लोकसभेत चर्चा करविल्या.  ज्याची परिणीती म्हणून 24 नोव्हेंबर 1992 पासून प्रत्येक संसदीय अधिवेशनाची सुरुवात ‘जनगणमन’ ने तर 23 डिसेंबर 1992 पासून समारोप ‘वंदेमातरम्’ ने होतो आहे अशी माहिती त्यांनी दिली. 

याच धर्तीवर आता उदय सामंत यांनी विद्यापीठे व महाविद्यालये यांच्या कार्यक्रमांची सुरुवात ‘जनगणमन’ ने करण्याच्या आदेशावर न थांबता या कार्यक्रमांची सांगता ‘वंदेमातरम्’ ने करण्याचे आदेशही द्यावेत. त्याचप्रमाणे हा निर्णय सर्व प्रकारच्या शाळांमध्येही शासनाने लागू करावा, अशी सूचना राम नाईक यांनी केली आहे.” प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर ‘जनगणमन’ या राष्ट्रगीत गायनाचा आदेश विद्यापीठाने व महाविद्यालयांना देत असल्याबद्दल पुन्हा एकदा उदय सामंत यांचे अभिनंदन करून शैक्षणिक संस्था आनंदाने या आदेशाचे पालन करतील असा विश्वासही राम नाईक यांनी शेवटी व्यक्त केला.