उत्साह, जल्लोषात नववर्षाचे स्वागत
By Admin | Updated: January 1, 2015 01:46 IST2015-01-01T01:46:44+5:302015-01-01T01:46:44+5:30
पनवेल, नवी मुंबईमध्ये नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. सर्व हॉटेल हाऊसफुल्ल झाली होती. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी संगीत कार्यक्रमांचेही आयोजन केले होते.

उत्साह, जल्लोषात नववर्षाचे स्वागत
नवी मुंबई : पनवेल, नवी मुंबईमध्ये नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. सर्व हॉटेल हाऊसफुल्ल झाली होती. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी संगीत कार्यक्रमांचेही आयोजन केले होते. अनेक ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करून नवीन वर्षाचे स्वागत करण्यात आले तर अनेकांनी दारूच्या पार्ट्यांना बगल देवून स्वच्छता मोहिमेसह आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होेते.
मावळत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी शहरातील सर्वच हॉटेल फुल्ल झाली होती. अनेक ठिकाणी संगीत मैफील आयोजित केली होती. अनेक ठिकाणी कानठळ्या बसविणाऱ्या म्युझिकच्या तालावर मध्यरात्रीपर्यंत तरुणाईसह इतर नागरिकही फेर धरून नाचत असल्याचे चित्र दिसत होते. शहरातील मद्यविक्री करणाऱ्या दुकानांच्या बाहेर उघड्यावरच मद्यपान सुरू असल्याचे चित्र दिसू लागले होते. दारू पिवून अपघात होवू नये यासाठी पोलिसांनी सर्व प्रमुख रोडवर कडक बंदोबस्त ठेवला होता. मद्यपी चालकांची तपासणी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात येत होती. अपघात होवू नये यासाठी सर्वांना वाहने सावकाश चालविण्याच्या सूचना दिल्या जात होत्या. थर्टीफर्स्ट साजरा करताना अनेक तरुण व्यसनांच्या आहारी जात असतात. यामुळे अनेक गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करून सहकुटुंब नवीन वर्षाचा आनंद घेण्यात आला. सोसायट्यांमध्ये विद्युत रोषणाईही करण्यात आली होती.
पामबीच रोडवरील महापालिकेच्या मुख्यालयामध्येही आकर्षित रोषणाई केली होती. मुख्यालय सर्वांचेच लक्ष वेधून घेत होते. अनेक ठिकाणी नागरिकांनी फटाक्यांची आतषबाजी करून नवीन वर्षाचे स्वागत केले. बार व रेस्टॉरंटमध्ये मद्यपान करून भांडणे होवू नयेत यासाठी गणवेशातील व साध्या वेशातील पोलीस रात्रभर गस्त घालत होते. पोलीस आयुक्तांसह सर्व वरिष्ठ अधिकारी सर्व स्थितीवर लक्ष ठेवून होते. अतिमद्यपान टाळण्याचे आवाहन केले जात होते. शहरात एकीकडे मद्याचा महापूर सुरू असताना अनेकांनी विधायक कामे सुरू करून वेगळा आदर्श निर्माण केला. नेरूळमध्ये सिडकोचे माजी संचालक नामदेव भगत, दिलीप आमले यांनी कीर्तन व भजनाचे आयोजन करून व्यसनांच्या आहारी न जाण्याचे आवाहन केले. (प्रतिनिधी)
रुग्णालयातील मुलांचा थर्टीफर्स्ट
थर्टी फर्स्टनिमित्ताने वाशीतील पालिका रुग्णालय येथे ‘अहो मा’ या संस्थेच्या वतीने लहान मुलांना खेळणी व फळांचे वाटप करण्यात आले. नव्या वर्षाच्या स्वागताचा आनंद रुग्णालयातील लहान मुलांना घेता यावा यासाठी नाताळबाबाच्या वेशात आलेल्या व्यक्तीने खेळणी वाटली.
विद्यार्थ्यांचा सत्कार : राबाडा परिसरात शिक्षण मंडळ सभापती सुधाकर सोनावणे यांच्यावतीने ३१ डिसेंबरला रात्री प्रत्येक वर्षी विद्यार्थी व नागरिकांचा गुणगौरव करण्यात येतो. यावर्षीही परिसरातील गुणवंतांचा गौरव करण्यात आला. यावेळी गुन्हे शाखेचे उपआयुक्त सुरेश मेंगडे यांच्यासह नगरसेविका रंजना सोनावणे, गौतमी सोनावणे व इतर मान्यवर उपस्थित होते.
बेलापूर किल्ल्याची साफसफाई : नवी मुंबईमधील शिवभक्त तरुणांनी ऐतिहासिक बेलापूर किल्ल्यावर साफसफाई मोहीम राबविली. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी दारूच्या पार्ट्यांमुळे तरुणाईचे जीवन उद्ध्वस्त होत आहे. व्यसनांपासून रोखण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. अनेकांनी रायगडावर तर नागरिकांनी शिर्र्डीला जाऊन देवदर्शनाने नवीन वर्षाचे स्वागत केले.
शहरात कडक बंदोबस्त
नवीन वर्षाचे स्वागत करताना कोणताही अनुचित प्रकार होवू नये यासाठी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. बार, दारू विक्रीची दुकाने व इतर ठिकाणी विशेष लक्ष ठेवण्यात येत होते. चौक व महत्त्वाच्या रोडवर विशेष बंदोबस्त ठेवला होता. सर्व वरिष्ठ अधिकारी रात्रभर शहरात फिरून बंदोबस्त व्यवस्थित सुरू आहे का याची माहिती घेत होते.
च्थर्टी फर्स्टच्या अनुषंगाने वाहतूक पोलिसांतर्फे शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती. त्यानुसार रात्री ११ वाजेपर्यंत ११६ जणांवर ड्रंक अँड ड्राईव्हच्या कारवाया करण्यात आल्याचे वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त दिनकर ठाकूर यांनी सांगितले, तर रात्री उशिरापर्यंत या कारवाया सुरु होत्या.
च्थर्टीफर्स्ट साजरा करुन वाहन चालवणाऱ्यांवर कारवाईसाठी तसेच शहरात सुरक्षेसाठी लावलेल्या चोख बंदोबस्तादरम्यान या कारवाया करण्यात आल्या आहेत.