सर्कसमध्ये रंगला विवाह सोहळा

By Admin | Updated: May 29, 2015 00:44 IST2015-05-29T00:44:50+5:302015-05-29T00:44:50+5:30

सर्कसमधील कलाकारांसाठी सर्कस ही नेहमीचीच; पण यंदा त्याला उत्साहाचे स्वरूप आले होते. निमित्त होते लग्नाचे... होय लग्नाचे!

Wedding concert in the circus | सर्कसमध्ये रंगला विवाह सोहळा

सर्कसमध्ये रंगला विवाह सोहळा

मुंबई : सर्कस म्हणजे बच्चेकंपनीचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. विविध कवायती प्रकार करणाऱ्या सुंदऱ्या, टिवल्याबावल्या करणारा विदूषक, आगीचे खेळ करणारे कलाकार अशी सर्कशीतील चित्तथरारक प्रात्यक्षिके पाहताना अंगावर रोमांच उभे राहतात. वर्सोवा मेट्रो स्टेशनजवळ गेल्या एक-सव्वा महिन्यापासून रेम्बो सर्कस सुरू आहे. सर्कसमधील कलाकारांसाठी सर्कस ही नेहमीचीच; पण यंदा त्याला उत्साहाचे स्वरूप आले होते. निमित्त होते लग्नाचे... होय लग्नाचे!
सर्कसमधील कलावंत आणि कोलंबियाचा नागरिक असलेला कार्लोस गेलेर्नो व नेपाळची नागरिक असलेली देवकी गौतम या युगुलाच्या लग्नासाठी सर्कसचा तंबू खास सजवण्यात आला होता. विद्युत रोशणाई, फुगे व विविध शोभेच्या वस्तूंनी तंबू नटूनथटून सज्ज होता. सर्कशीतील सगळ्यांचीच लगबग सुरू होती. कार्लोस आणि देवकीचा हा सर्कशीच्या तंबूतील विवाह जगातील पहिलीच घटना असावी, असे सर्कसचे मालक सुजीत दिलीप यांनी सांगितले. सुजीत दिलीप यांच्या पुढाकाराने या विवाहाचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण विवाह व्यवस्था व सर्व खर्चही सर्कसच्या व्यवस्थापनातर्फेच करण्यात आला. गेल्या पाच वर्षांपासून रेम्बो सर्कशीत ते दोघे एकत्र काम करीत आहेत. देवकी व कार्लोस यांच्यात मैत्री होऊन हळूहळू त्याचे रूपांतर प्रेमात झाले. पांढराशुभ्र लग्नाचा गाऊन परिधान केलेली नववधू देवकी तर सुटाबुटातील कार्लोसवर या वेळी शुभेच्छांचा वर्षाव झाला. ख्रिस्ती धर्मगुरूंनी पवित्र श्लोकाचे पठण केल्यानंतर देवकी व कार्लोसने एकमेकांच्या बोटात लग्नाची अंगठी घालून एकमेकांचा पती-पत्नी म्हणून स्वीकार केला. संपूर्ण सर्कस मंडपात उत्साहाचे वातावरण होते. (प्रतिनिधी)

Web Title: Wedding concert in the circus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.