Join us  

मुंबईच्या पूर्व किनारपट्टीवर समुद्राच्या साक्षीने रंगणार विवाह सोहळे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2019 3:44 AM

मुंबई पोर्ट ट्रस्टचा प्रकल्प : किनारपट्टी सुशोभीकरणाला वेग

खलील गिरकर 

मुंबई : मुंबईच्या पूर्व किनारपट्टीवरील भाऊच्या धक्क्याजवळील डोमॅस्टिक क्रुझ टर्मिनल ते आंतरराष्ट्रीय क्रुझ टर्मिनल परिसरातील सुशोभीकरणाला वेग आला आहे. डोमॅस्टिक क्रुझ टर्मिनलच्या इमारतीची पुनर्रचना करण्यात येत असून, तेथे अत्याधुनिक सोयीसुविधांचे रेस्टॉरंट उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. टर्मिनलसमोरील परिसरात हिरवळ तयार केली असून, तेथे समुद्र्राच्या साक्षीने विवाह सोहळे आयोजित करण्यास परवानगी देणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना लवकरच समुद्रकिनारी विवाह करण्याची संधी मिळणार आहे. या माध्यमातून पूर्व किनारपट्टीवरील पहिला प्रकल्प मार्चपर्यंत सुरू होईल.

डोमेस्टिक क्रुझ टर्मिनल इमारतीच्या तळमजल्यावर प्रवाशांच्या सेवेसाठी सुविधा पुरवण्यात येत असून, पहिल्या मजल्यावर रेस्टॉरन्ट व दुसऱ्या मजल्यावर विविध समारंभांसाठी बॅन्क्वेट हॉल उभारण्यात येत आहेत. सूर्यास्ताचे दर्शन घेत समुद्रकिनाºयावर नैसर्गिक वातावरणात जेवणाचा आनंद लुटता येणार आहे. मार्च महिन्यापर्यंत ही सेवा सुरू होईल. हा परिसर डॉकबाहेर असल्याने विविध कार्यक्रमांसाठी परवानगी घेण्याची गरज भासणार नाही, असे सांगण्यात आले. टर्मिनलच्या उघड्या छतावर पार्टी करण्याची संधी मिळणार आहे. सी साईड रेस्टॉरन्टचे काम फेब्रुवारी-मार्चपर्यंत सुरू करण्यात येणार आहे.अ‍ॅम्फीथिएटरचे काम पूर्ण झाले आहे. त्यामध्ये २५० प्रेक्षकांच्या बसण्याची सोय करण्यात आली आहे. यामुळे समुद्रामधून येणाºया वाºयाच्या सान्निध्यात सांस्कृतिक कार्यक्रमांचा आस्वाद घेणे शक्य होणार आहे. २५०० चौ.मी. भागाच्या स्केटिंग रिंगचे कामदेखील पूर्ण झाले आहे. रो पॅक्सचे काम पूर्ण झाले आहे. तर, मुंबई इंटरनॅशनल क्रुझ टर्मिनलचे काम वेगाने सुरूआहे.मुंबईच्या पूर्व किनारपट्टीचा चेहरामोहरा बदलण्याचा प्रकल्प लवकरच पूर्णत्वास जाईल. अनेक विकासकामे पूर्णत्वास गेली आहेत. तर उर्वरित प्रकल्पांच्या कामाला वेग आला आहे. ही सर्व कामे पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी मोठ्या संख्येने नागरिकांना विविध सेवा उपलब्ध होतील व त्या माध्यमातून मोठा महसूल प्राप्त होईल.- संजय भाटिया, अध्यक्ष, मुंबई पोर्ट ट्रस्ट 

टॅग्स :मुंबईसागरी महामार्गलग्न