Join us
Daily Top 2Weekly Top 5

दोन महिन्यांच्या वीजबिलांच्या समस्या सोडविणार वेबिनार, ग्राहक तक्रार निवारण कक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2020 01:14 IST

लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये ग्राहकांकडील मीटरचे रीडिंग घेता आले नाही. त्यामुळे एप्रिल व मे महिन्यात सरासरी वीजवापरानुसार वीजबिल देण्यात आले.

मुंबई : जून महिन्यामध्ये मागील दोन महिन्यांसह मीटर रीडिंगनुसार वीजबिल दिल्यानंतर त्याबाबतीत ग्राहकांमध्ये असलेल्या शंकांचे निरसन तसेच तक्रारींचे निवारण करण्यासाठी महावितरणच्या राज्यभरातील सर्व कार्यालयांमध्ये ग्राहक तक्रार निवारण कक्ष सुरू करण्यात आले आहेत. यासोबतच वीजबिलांबाबत ग्राहकांचा संभ्रम दूर करण्यासाठी विविध ठिकाणी मेळाव्यांसह वेबिनारचे आयोजन करण्यात येत आहे. लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये ग्राहकांकडील मीटरचे रीडिंग घेता आले नाही. त्यामुळे एप्रिल व मे महिन्यात सरासरी वीजवापरानुसार वीजबिल देण्यात आले. सध्या, मीटर रीडींग घेऊन प्रत्यक्ष वीजवापरानुसार एप्रिल व मे महिन्यांसह जून महिन्याचे एकत्रित वीजबिल देण्यात येत आहे.या वीजबिलाबाबत ग्राहकांमध्ये असलेला संभ्रम दूर करण्यासाठी महावितरणच्या शाखा, उपविभाग, विभाग, मंडल व परिमंडलस्तरावर ग्राहक तक्रार निवारण कक्ष सुरु करण्यात आले आहेत. महावितरणमधील तांत्रिक, लेखा, वित्त, आणि माहिती तंत्रज्ञान विभागातील सर्व कर्मचाऱ्यांचे वेगवेगळे गट तयार करून हे कक्ष सुरु करण्यात आले आहेत.जून महिन्याच्या वीजबिलाची आकारणी यामध्ये सांगण्यात येईल.>ग्राहकांच्या तक्रारी व शंका दूर करण्यात येईल. तसेच शहरी भागात मोठमोठ्या रहिवासी क्षेत्रांत किंवा सोसायट्यांमध्ये आणि ग्रामीण भागात गाव किंवा वाडी पातळीवर ग्राहक मेळाव्यांचे आयोजन करण्यात येत असून वीजबिलांबाबत संभ्रम व तक्रारी दूर करण्यात येणार आहेत. ग्राहक तक्रार निवारण कक्ष व मेळावे घेताना कोविड-१९ संदर्भात सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात येणार आहे. यासोबतच मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता यांच्या स्तरावर ‘वेबिनार’चे आयोजन करण्यात येत आहे.